यवतचा ओढा स्वच्छ करण्याच्या सूचना
By admin | Published: June 28, 2016 01:30 AM2016-06-28T01:30:39+5:302016-06-28T01:30:39+5:30
यवत येथील ओढ्याच्या पुलाखाली पुणे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणा वेळी पडलेला राडारोडा अद्याप तसाच आहे.
यवत : यवत येथील ओढ्याच्या पुलाखाली पुणे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणा वेळी पडलेला राडारोडा अद्याप तसाच आहे. परिसरातील सांडपाणी पुलाजवळ साठल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता, असे वृत्त दैनिक लोकमतमधून प्रसिद्ध होताच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बातमीची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यवत येथे ओढ्यातून पावसाच्या पाण्यामुळे पूर आल्यास संत तुकाराममहाराज पालखी तळ असणाऱ्या श्री काळभैरवनाथ मंदिरातदेखील पुराचे पाणी जाण्याच्या धोका आहे. दोन वर्षांपूर्वी पुराचे पाणी मंदिरात घुसले होते. पुणे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणा वेळी पुलाचे काम केल्यानंतर पुलाखाली पडलेला राडारोडा तसाच राहिल्याने पुलाच्या दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहते. त्यातच या ओढ्यात आजूबाजूच्या नागरी वसाहतींमधील सांडपाणी सोडण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी सांडपाण्याचा बंधाराच तयार झाला आहे. याबाबतची बातमी लोकमतमधून नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वीय सहायकांनी माहामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिवाण यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी मंगळवारी (दि. २८) प्रत्यक्ष स्थळपाहणी करून याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी, महामार्गाचे चौपदरीकरण केलेल्या कंपनीचे पाटस पथकर नाक्यावरील अधिकारी सुनील पणारी, पवन सिंग व इतरांनी यवत येथील ओढ्याच्या पुलाची पाहणी केली.
कंपनीच्या अधिकारी वर्गासमवेत यवत येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य इम्रान तांबोळी व इतरदेखील उपस्थित होते.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीने निष्काळजीपणा दाखविल्याने पुलखाली पडलेला राडारोडा व काँक्रीट तसेच पडून राहिले. याच दुष्परिणाम यवतवासीयांना भोगावा लागत आहे. वारंवार सदर काम पूर्ण करण्याची मागणी करूनदेखील सदर कंपनी काम अर्धवट करीत आहे. मागील ३ वेळा दौड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी हे काम करण्याची मागणी केल्यानंतर काम अर्धवट करून तसेच ठेवण्याचे काम कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. टोलवसुली करण्याचे काम सुरू झाल्यानंतर आता कंपनी त्यांची अर्धवट कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
अंग काढण्याचा कंपनीचा प्रयत्न...
ओढ्याच्या पुलाच्या खालील राडारोडा काढण्याचे काम करण्याच्या पाहणी करण्यासाठी आलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरण केलेल्या अधिकाऱ्यांनी सदर काम ग्रामपंचायतीचे असल्याचे सांगून अंग झटकण्याच्या प्रयत्न केला; मात्र त्या वेळी तेथे उपस्थित इम्रान तांबोळी यांनी पुलाच्या खालील व महामार्गाच्या हद्दीतील कामे संबंधित कंपनीने पूर्ण करून द्यावी, अशी मागणी केली. आता मंगळवारी (दि. २८) महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिवाण यांनी स्थळपाहणी केल्यावर ते काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे.