विवाहितेचा विनयभंग करून संशयिताची आत्महत्या
By admin | Published: October 27, 2016 09:52 PM2016-10-27T21:52:59+5:302016-10-27T21:52:59+5:30
विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या संशयिताने गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील एका गावात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
कऱ्हाड (सातारा), दि. २७ : विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या संशयिताने गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील एका गावात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील एका गावातील एक विवाहिता बुधवारी रात्री पती बाहेरगावी गेल्याने एकटीच घरात होती. ती रात्री घरात झोपलेली असताना मध्यरात्री गावातील एक ३२ वर्षीय व्यक्ती त्यांच्या घरात आला. त्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न करताच विवाहितेला जाग आली. तिने बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांसह बाहेर झोपलेले इतर नातेवाईक जागे झाले. विवाहितेने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर संबंधित विवाहितेस तिचे काही नातेवाईक गुरुवारी सकाळी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्यांनी घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर त्या संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हाही नोंद करण्यात आला.
दरम्यान, एकीकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली जात असतानाच संशयित युवकाने गावानजीकच्या भोसले मळा नावच्या शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या दोन्ही घटनांची नोंद करून सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.