धुळ्यात आरोपीची कोठडीत आत्महत्या
By admin | Published: March 15, 2017 04:01 AM2017-03-15T04:01:08+5:302017-03-15T04:01:08+5:30
रुग्णांच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रोहन मामुनकर यांना जबर मारहाण केली
धुळे : रुग्णांच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रोहन मामुनकर यांना जबर मारहाण केली. याप्रकरणी अटक ९ पैकी प्रदीप वेताळ (२३) याने मंगळवारी दुपारी शहर पोलीस स्टेशनच्या शौचालयात चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी जाहीर केले.
सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्करबर्डी शिवारात १२ मार्चला सकाळी चैत्राम लष्कर यास बाइक घसरून डोक्याला मार लागला होता़ त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्याचे सिटीस्कॅन करताना तो डोके हलवित असल्याने अडथळे येत असल्याचे डॉ. रोहन मामुनकर यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या जखमींच्या नातेवाईकानी डॉक्टरांना मारहाण करुन साहित्याची तोडफोड केली होती. या प्र्रकरणामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही बसवावे अशी मार्डने मागणी केली आहे. (प्रतिनिधी)