सहाय्यक फौजदाराची पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्त्या
By Admin | Published: October 14, 2014 01:08 PM2014-10-14T13:08:13+5:302014-10-14T14:55:17+5:30
दोन हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अंभी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक फौजदाराने गळफास घेवून आत्महत्त्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
>उस्मानाबाद, दि. १४ - दोन हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अंभी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार एस.ए.काझी यांनी उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांच्या टॉलेटमध्ये सोमवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्त्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अवैध दारू विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी एका तक्रारदाराकडून दोन हजार रूपयाची लाच घेताना अॅन्टी करेप्शन ब्युरोच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या सहका-यांनी सोमवारी दुपारी काझी यांना अटक केली होती.त्यानंतर काझी यांची अंभीमध्ये चौकशी करून उस्मानाबादमध्ये आणण्यात आले होते आणि शहर पोलीस स्टेशनच्या पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजून ३० मिनीटाच्या सुमारास काझी यांना शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले होते.त्यानंतर काझी हे सव्वा तीनच्या सुमारास पोलीस कर्मचा-यांच्या टॉलेटमध्ये लघवी करण्याच्या निमित्ताने गेले आणि खिडकीच्या गजाला गमज्या अडकावून गळफास आत्महत्त्या केली.त्यानंतर काही वेळाने हा आत्महत्त्येचा हा प्रकार लक्षात आला आणि शहर पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली. यावेळी सुरक्षा गार्ड कोण होता,स्टेशन डायरीवर कोणाची नेमणूक होती, पोलीस निरीक्षक कोठे होते, याबाबत आता चौकशी होईल. यात दोषी कोण याचीही चौकशी होईल पण काझी यांनी लाच मागितली नव्हती, त्यांना बळजबरीने बळीचा बकरा बनविण्यात आले असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
मयत सहाय्यक फौजदार काझी हे उस्मानाबाद येथील समतानगरमधील रहिवासी आहेत. ते अंभी येथे ड्युटीला होते. त्यांना तीन मुले असून, एक मुलगा हैद्राबादला असतो. घरातील तिघेजण पोलीस खात्यातच ड्युटीला असून, एक भाऊ न्यायाधीश असल्याचे सांगण्यात आले. सर्व कुटुंब प्रतिष्ठित असल्यामुळे काझी यांना पश्चाताप झाला असावा आणि त्यातून त्यांनी आत्महत्त्या केली असावी,असा काही जणांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस हे प्रकरण कशाप्रकारे हाताळतात याकडे लक्ष आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त पांगला असून त्यात या घटनेमुळे पोलीसांची कसोटी लागली आहे.