शेतकरी दाम्पत्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: November 13, 2015 02:22 AM2015-11-13T02:22:03+5:302015-11-13T02:22:03+5:30
पातूर तालुक्यातील घटना ; पत्नीची प्रकृती चिंताजनक.
पातूर (जि. अकोला) : तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी दाम्पत्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून १२ नोव्हेंबर रोजी दुपारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी दोघांना उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. पार्डी येथील शेतकरी सागर पुंडलिक सोनोने (३५) व वृषाली सागर सोनोने (३0) यांची खानापूर शिवारात सात एकर शेती आहे. शेतातील अल्प उत्पन्नामुळे कुटंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सागर ऑटोरिक्षाही चालवतो. सोनोने यांच्याकडे पातूरच्या युनियन बँक ऑफ इंडियाचे ५0 हजार रुपयांचे कर्ज आहे. नापिकी, डोक्यावरील कर्ज यामुळे त्याला नैराश्य आले. या नैराश्यातूनच सागर व वृषालीने गुरुवारी दुपारी १.२0 वाजता विष प्राशन केले. पती, पत्नीने विष प्राशन केल्याची माहिती ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तातडीने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले. सागरची प्रकृती सुधारत असली, तरी वृषालीची प्रकृती हे वृत्त लिहिपर्यंत चिंताजनक होती. या दाम्पत्याला दोन जुळी मुले व एक मुलगी आहे.