विधानभवनासमोर आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: March 7, 2017 04:45 AM2017-03-07T04:45:33+5:302017-03-07T04:45:33+5:30
विधानभवनासमोर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संगमनेरच्या २५ वर्षाच्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
मुंबई : विधानभवनासमोर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संगमनेरच्या २५ वर्षाच्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. अनिल गंगाराम सहाणे उर्फ संदीप असे तरुणाचे नाव असून त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचा संगमनेरचा रहिवासी असलेल्या संदीप विरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आपल्यावर अन्याय केला असल्याचा आरोप संदीपने केला आहे. शुक्रवारी त्याने संगमनेर पोलिसांना विधानभवनासमोर आत्महत्या करत असल्याचा इशारा दिला. त्यामुळे घटनेची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. विधान भवनाजवळील वाल्मिकी चौकात येताच संदिपने किटकनाशक औषध प्राशान करत आत्महत्येचा प्रयत्न केला. संगमनेर पोलिसांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)