आरोपी पळाल्याने केली आत्महत्या!
By admin | Published: January 16, 2015 05:55 AM2015-01-16T05:55:09+5:302015-01-16T05:55:09+5:30
ताब्यातील आरोपी पळून गेल्यानंतर संभाव्य कारवाईच्या भीतीने अजीम खान पठाण उर्फ बाबा पठाण या पोलिसाने गोळी झाडून आत्महत्या
बीड : ताब्यातील आरोपी पळून गेल्यानंतर संभाव्य कारवाईच्या भीतीने अजीम खान पठाण उर्फ बाबा पठाण या पोलिसाने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघड झाले़ बुधवारी रात्री त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते़ त्यांच्याजवळील बॅगेमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून हा खुलासा झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले अजीम खान पठाण उर्फ बाबा पठाण यांच्याकडे जिल्हा कारागृहातील आरोपी न्यायालयात ने-आण करण्याची जबाबदारी होती. अजीम खान पठाण व गोपीचंद कंगाले यांच्यावर जबरी चोरीतील आरोपी सतीश चव्हाण याला गेवराई न्यायालयात नेण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार त्यांनी कारागृहातून आरोपी चव्हाणला ताब्यात घेतले.
न्यायालयात हजर करून बीडकडे परतत असताना चव्हाण पळून गेला. त्यामुळे पठाण व कंगाले हे घाबरून गेले. दरम्यान, सायंकाळी पठाण हे मुख्यालयात परतले. आरोपी पळून गेल्याने आपल्यावर कारवाई होईल, या भीतीपोटी पोलीस मुख्यालयातील शस्त्र जमा करण्याच्या ठिकाणी पठाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली़ त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
गुरुवारी सकाळी पठाण यांचा दफनविधी करण्यात आला. अजीम खान पठाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी शिवाजी नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी रात्री कंगाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नव्हता. गुरुवारी कंगाले यांची चौकशी केली असता कंगाले हा वेगवेगळे जबाब देत होता. त्यामुळे आरोपी सतीश चव्हाण हा कोठून व कसा पळून गेला हे समजू शकले नव्हते. त्याची चौकीशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आत्महत्येच्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)