शिर्डीत तरुणाची पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Published: March 31, 2016 04:22 PM2016-03-31T16:22:50+5:302016-03-31T16:22:50+5:30
पाकीटमारीच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यातच आपल्या कमरेच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
>ऑनलाइन लोकमत -
शिर्डी, दि. ३१ - पाकीटमारीच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यातच आपल्या कमरेच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. किरण अशोक रोकडे(18) असे या तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास या तरुणाला मंदिर परिसरात पाकीटमारीच्या संशयावरून मंदिर सुरक्षा रक्षक राक्षे व पिंपळे यांनी शिर्डी पोलिसांत दिले होते. ठाणे अंमलदार आयुब शेख यांनी त्याला लॉकअप गार्डच्या ताब्यात दिले. यांनंतर काही वेळात या तरुणाने लॉकअपच्या दरवाजाला आपल्याच कमरेचा बेल्टच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच ठाणे अंमलदार शेख यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना हा प्रकार कळवला, त्यानंतर वाघ यांनी तातडीने तरुणाला साईबाबा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले होते तर त्याच्याकडील चीजवस्तू काढून का घेतली नव्हती ? त्याने स्वतः गळफास घेतला तेव्हा कोठडीचे सुरक्षा रक्षक कुठे होते ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावेळी कोठडीच्या सुरक्षेसाठी सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, पोलीस कर्मचारी माने व आव्हाड हे ड्युटीवर होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी शिर्डीत दाखल होत आहेत. नातेवाईकांच्या मागणीनुसार पोस्टमार्टेम पुणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.