डब्बा व्यापा-याची आत्महत्या
By admin | Published: August 12, 2016 11:30 PM2016-08-12T23:30:58+5:302016-08-12T23:30:58+5:30
सट्टेबाजीचा डब्बा फुटल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या दिनेश गोकलानी (वय ३३, रा. क्वेट्टा कॉलनी) नामक डब्बा व्यापा-याने आत्महत्या केली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 12- हजारो कोटी रुपयांची सट्टेबाजीचा डब्बा फुटल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या दिनेश गोकलानी (वय ३३, रा. क्वेट्टा कॉलनी) नामक डब्बा व्यापा-याने आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली. मात्र, याबाबतची माहिती उघड होऊ नये म्हणून पोलिसांनी रात्रीपर्यंत प्रयत्न केले होते, हे विशेष !
देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालू पाहणारी डब्बा ट्रेडिंगची सट्टेबाजी उघड झाल्यानंतर गुन्हेशाखेने १२ मे २०१६ ला एल-७ समूहासह विविध ठिकाणी धाडी घातल्या होत्या. त्यात गोकलानी बंधूच्या टेलिफोन एक्स्चेंज चौकातील कार्यालयाचाही समावेश होता. या गोरखधंद्याचा सूत्रधार रवी अग्रवाल, वीणा सारडासह दिनेश गोकलानीही फरार होता. तो त्याच्या मित्राच्या नावावर असलेल्या बेसा भागातील गगन अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत लपून राहत होता. घरची मंडळी आणि निवडक मित्र त्याला येथेच भेटायला येत होते. त्याच्या सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण अभिषेक नामक मित्र आणून देत होता.
दरम्यान, डब्ब्यात शेकडो कोटी रुपये फसल्यामुळे गोकलानीचा व्यवहार ठप्प झाला होता. त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता. पैसे मागण्यासाठी गोकलानीच्या घरी अनेक जण चकरा मारत होते. त्याची त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडून वेळोवेळी दिनेशला माहिती मिळत होती. कर्जदारांचा तगादा वाढला असतानाच पोलिसांच्या कारवाईचाही धाक असल्याने दिनेशची मानसिक स्थिती बिघडली होती. तो अलिकडे आपली व्यथा मित्रांना बोलूनही दाखवत होता. तर, मित्र आणि नातेवाईक त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होते. कोर्टातून जामिन मिळेल, अशीही आशा दाखवत होते.
शेवटच्या भेटीत मित्राजवळ रडला ?
नेहमीप्रमाणे आज सकाळी अभिषेकने दिनेशला सकाळचा चहा, नाश्ता आणून दिला. त्यावेळी दिनेश त्याच्या मित्राजवळ रडल्याची चर्चा त्याच्या निकटवर्तियातून पुढे आली. त्यावेळी त्याला दिलासा देत अभिषेक निघून गेला. त्यानंतर एका मित्रासह दुपारी दीड ते दोनच्या सुमारास जेवणाचा डब्बा घेऊन आला. नेहमीप्रमाणे त्याने दार ठोठावले. मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मित्राने बाजुच्या खिडकीच्या फटीतून डोकावून बघितले असता दिनेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे या दोघांना जबर हादरा बसला. त्यांनी घरच्यांना कळविले. नंतर पोलिसांना सांगण्यात आले. फरार डब्बा व्यापा-याने आत्महत्या केल्याची वार्ता वरिष्ठ पोलीस अधिका-यांना कळविण्यात आली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. हुडकेश्वर ठाण्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. दरम्यान, डब्बा व्यापा-याच्या आत्महत्येची वार्ता तातडीने सर्वत्र पोहचू नये म्हणून पोलिसांनी रात्रीपर्यंत खबरदारी घेतली होती.