प्रेयसीच्या घरासमोरच आत्महत्या
By admin | Published: April 10, 2016 03:00 AM2016-04-10T03:00:16+5:302016-04-10T03:00:16+5:30
प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही तिचा पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरसमोर
पुणे : प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही तिचा पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरसमोर पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. अजित आत्माराम इंगळे (२६, रा. मंगळवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे हा फलटणमध्ये इलेक्ट्रिकल ठेकेदार आहे. त्याचे नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही तरुणी हडपसर-सासवड रस्त्यावरच्या ग्लायडींग सेंटरसमोर राहत आहे. त्यांच्या प्रेमसंबंधाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी इंगळेचा लग्नाचा प्रस्ताव नाकारत तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतरही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही.
‘माझ्याशी लग्न कर. नाहीतर मी तुझ्या घरासमोर आत्महत्या करेन,’ अशी धमकी तो देत होता. गुढीपाडव्याला तरुणी माहेरी आली होती. याची माहिती मिळताच तो फलटणवरून मित्राची मोटार घेऊन पुण्यामध्ये आला. तरुणीला फोन करून त्याने ‘भेटायला ये, अन्यथा तुझ्या घरासमोर आत्महत्या करीन’ अशी धमकी दिली व मोटारीमध्येच स्वत:ला पेटवून घेतले. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आग भडकली.
आत्महत्या करण्यापूर्वी इंगळेने फेसबुकवर शेवटची पोस्ट अपलोड केली होती. प्रेयसीचे नाव लिहिलेला त्याचा फोटो त्याने फेसबुक वॉलवर कव्हर फोटो म्हणून ५ वाजून २४ मिनिटांनी अपलोड केला होता. (प्रतिनिधी)
फलटणमध्ये अंत्यसंस्कार
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यावर इंगळेचा जळालेला मृतदेह मिळाला. फलटण येथील स्मशानभूमीत अजित इंगळेवर शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.