भांडगाव येथील कुटुंबाला मारहाण
By Admin | Published: June 27, 2016 01:24 AM2016-06-27T01:24:41+5:302016-06-27T01:24:41+5:30
म्हसोबा देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून जबरी मारहाण करण्याचा व कुटुंबातील महिलांच्या छेडछाडीचा प्रकार होऊनही इंदापूर पोलीस निष्पन्न झालेल्या इतर दोन आरोपींवर गुन्हा दाखल
इंदापूर : तब्बल एक महिन्यापूर्वी भांडगाव येथील म्हसोबा देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून जबरी मारहाण करण्याचा व कुटुंबातील महिलांच्या छेडछाडीचा प्रकार होऊनही इंदापूर पोलीस निष्पन्न झालेल्या इतर दोन आरोपींवर गुन्हा दाखल करत नाहीत, अशी तक्रार सोलापूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० चे सहायक पोलीस फौजदार संभाजी शिंदे यांनी निवेदनाद्वारे इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
संभाजी शिंदे हे ११ मे रोजी कुटुंबीयांसह म्हसोबा देवस्थानच्या यात्रेला भांडगाव येथे गेले होते. सायंकाळी परतताना, शिंदे यांची पत्नी व भावजय सोबत आणलेले शिल्लक सामान बरोबर असणाऱ्या वाहनात भरत होत्या. त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे दत्तात्रय गायकवाड, नामदेव गायकवाड, दिलीप गायकवाड (सर्व रा. भांडगाव) हे त्या ठिकाणी आले. शिल्लक राहिलेले सामान ट्रस्टचे असते. ते तेथेच ठेवून जा, असे दत्तात्रय गायकवाड त्यांना म्हणाले. त्यावर आमचे घर जवळच आहे, असे शिंदे यांच्या भावजयीने सांगितले. शिंदे कुटुंबीय पीठ व लाकडे गाडीत भरत असताना, संभाजी शिंदे व त्यांच्या कुटुंबातील महिलांना वरील लोकांनी धक्काबुक्की केली. महिलांना का मारता, अशी विचारणा शिंदे यांनी केली. त्यामुळे वरील लोकांसह ट्रस्टच्या इतर सदस्यांनी एकत्र येऊन संभाजी शिंदे यांच्या डोक्यात, कपाळावर, हातापायांवर काठीने बेदम मारहाण केली. सोडवण्यासाठी आलेल्या मुले, सुना व नातलगांनादेखील मारहाण केली. त्यामध्ये बबलू धनाजी जाधव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अस्थिभंग झाला. पाच महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या सुनेलाही सोडले नाही. महिलांची दगड व काठीने डोकी फोडली आहेत, असे शिंदे यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात शिंदे यांनी बावडा पोलिसांकडे त्याच वेळी तक्रार दिली. इतर आरोपींची नावे माहीत नसल्याने ती त्या वेळी देता आली नाहीत. मात्र, त्या वेळच्या ठाणे अंमलदारांनी एक आरोपी सापडला की, आम्हाला सर्वांची नावे कळतील, असे सांगून शिंदे यांची समजूत घातली. शिंदे यांनी चौकशी करून सतीश जाधव व बाळू गायकवाड या मारहाण करणाऱ्या दोघांची नावे पोलिसांना कळवली. त्यांचा आरोपींमध्ये समावेश करण्यात यावा. मारहाणीचा प्रकार गंभीर असल्याने भा.दं.वि. कलम ३२६, ३५४ ब नुसार सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र, रात्रीच आम्ही सर्व आरोपींची नावे कळवली आहेत. आत्ता आम्ही काही करू शकत नाही, असे उत्तर सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिल्याचे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या संदर्भात विचारणा केली असता, या कथीत मारहाण प्रकरणातील सर्व वैद्यकीय अहवालात कुणालाही गंभीर मारहाण झाल्याचे नमूद करण्यात आले नाही. कुणीही उपचारासाठी दवाखान्यात दाखल नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी मागणी केलेली भारतीय दंड विधानाची कलमे लावण्यात आलेली नाहीत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
(वार्ताहर)
ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात बावडा पोलीस ठाणे, बारामतीचे उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे व मुंबईचे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अनेक तक्रारी झाल्या आहेत. गुंडशाहीमुळे सामान्य लोक त्यांच्या विरुद्ध तक्रारी देण्यास घाबरतात. पशुहत्याबंदी, दारूबंदीचे शासकीय नियम धाब्यावर बसवले जातात. मनमानी कारभार करून यात्रेकरू, भाविकांना लुबाडले जाते. मारहाण केली जाते. याबाबतचे चित्रीकरण आपल्याकडे असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आपण व आपली दोन मुले पोलीस खात्यात असताना, जर अमानुष मारहाण होत असेल, तर सामान्यांचे काय होत असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.