मुलगा आणि भावाचे अपहरण करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 05:25 AM2017-06-22T05:25:33+5:302017-06-22T05:25:33+5:30
कोणत्याही गुन्ह्याशी संंबंध नसताना भाऊ आणि मुलगा यांचे घरातून पहाटे दोन वाजता अपहरण करून त्यांना
शशी करपे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : कोणत्याही गुन्ह्याशी संंबंध नसताना भाऊ आणि मुलगा यांचे घरातून पहाटे दोन वाजता अपहरण करून त्यांना बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेऊन जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपाच्या युवा मोर्चाचे पालघर-ठाणे जिल्हा सरचिटणीस अरुण सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे. याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सिंग यांनी केली आहे.
माहितीच्या अधिकारात माहिती मागवून एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार पोलिसांनी गु्न्हा दाखल करून महिला पत्रकार ज्योती तिवारी, तिचे वडिल लक्ष्मीकांत तिवारी, रोहित कोनारी यांना ७ जून २०१७ ला अटक केली आहे. त्यानंतर याप्रकरणात आपला कोणताही सहभाग नसताना विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक डोईफोडे, हवालदार गांगुर्डे यांच्यासह सात-आठ पोलीस साध्या वेषात १५ जूनच्या पहाटे दोन वाजता दरवाजा तोडून आपल्या घरात घुसले. घरात असलेल्या सीसीटीव्ही डिव्हीडी तोडून टाकला. त्यानंतर मुलगा अनुज सिंग (१८) आणि भाऊ अजित सिंग (३२) यांना बेकायदेशीरपणे विरार पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये टाकले. त्याठिकाणी दोघांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कळल्यानंतर पोलीस तिवारीप्रकरणात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती असल्याने आपण वसई कोर्टातून १५ जूनला अटकपूर्व जामीन घेतला. ही माहिती मिळाल्यानंतर विरार पोलिसांनी मुलगा आणि भावाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोडून दिले. असा आरोप अरुण सिंग यांनी केला आहे. पोलिसांवर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तक्रार आली असेल तर त्याची शहानिशा केली जाईल, असे डिवायएसपी जयंत बजबळे यांनी सांगितले.