औरंगाबादहून कुरिअरने पोहोचली सुसाईड नोट
By Admin | Published: July 16, 2016 07:47 PM2016-07-16T19:47:21+5:302016-07-16T19:47:21+5:30
भविष्य निर्वाहनिधीचे पैसे आणण्यासाठी औरंगाबादला गेलेला मॅनेजर परत आला नाही, परंतु त्याची सुसाईड नोट कुरिअरने घरी पोहोचल्याने कुटुंबियांना धक्का बसला
>ऑनलाइन लोकमत -
मॅनेजर बेपत्ताच : कुटुंबियांची यवतमाळ पोलीस ठाण्यात धाव
यवतमाळ, दि. 16 - भविष्य निर्वाहनिधीचे पैसे आणण्यासाठी औरंगाबादला गेलेला मॅनेजर परत आला नाही. परंतु त्याची सुसाईड नोट कुरिअरने घरी पोहोचल्याने कुटुंबियांना धक्का बसला. अखेर ही सुसाईड नोट घेऊन कुटुंबीय शनिवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. मॅनेजर पदावर कार्यरत कुटुंबातील सदस्याचा शोध घ्यावा म्हणून त्यांनी पोलिसांना साकडे घातले आहे.
अनिल ज्ञानेश्वर मोहले (३८) रा. बुटले ले-आऊट पिंपळगाव ता. यवतमाळ असे या मॅनेजरचे नाव आहे. औरंगाबाद येथील ग्रामीण फायनान्स कंपनीच्या यवतमाळ शाखेत सहा महिन्यांपूर्वी ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. २० दिवसांपूर्वी त्यांनी ती कंपनी सोडून दूध डेअरीमध्ये समकक्ष पदावर नोकरी स्वीकारली. ३ जुलै रोजी रात्री ९ वाजता अनिल हे औरंगाबादला जुन्या फायनान्स कंपनीतील भविष्य निर्वाह निधीचे पैसे आणण्यासाठी जातो म्हणून पत्नी हर्षा हिला सांगून गेले. मात्र तेव्हापासून परत आले नाही किंवा त्यांचा फोनही लागला नाही. शोधाशोध करूनही थांगपत्ता न लागल्याने कुटुंबियांनी १२ जुलै रोजी अखेर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात अनिल बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदविली.
दरम्यान १३ जुलै रोजी औरंगाबाद येथील डीटीडीसी कंपनीमार्फत एक कुरिअर मोहले कुटुंबियांना प्राप्त झाले. त्यात अनिलची सुसाईड नोट होती. मी जलसमाधी घेतली आहे, माझा कुणी शोध घेऊ नये, माझे क्रियाकर्म उरकून घ्यावे, असे त्यात नमूद असल्याचे सांगण्यात आले. अखेर ही चिठ्ठी घेऊन अनिलचे वडील ज्ञानेश्वर भीमराव मोहले यांनी पुन्हा यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठले. पोलीस आता अनिलचा थांगपत्ता लागतो का या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.
पोलीस सूत्रानुसार, अनिलचा नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे प्लॉट आहे. तो त्यांनी सुमारे पाच लाखात विकला. त्यातील अडीच लाख त्याला मिळाले, यातून ९० हजार त्याने आईला दिले. उर्वरित पैसे त्यांनी स्टेट बँकेच्या आपल्या खात्यातून दोन-तीन वेळा काढल्याचे सांगितले जाते. अनिलला हर्षद व आकांक्षा ही दोन मुले आहेत. सुसाईड नोटमुळे मोहले कुटुंबीय चिंतेत आहे. अनिलचा मोबाईल बंद आहे. परंतु त्याच्या कॉल डिटेल्सवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती यवतमाळ शहरचे प्रभारी ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी ‘लोकमत’ला दिली.