...अन् मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; आईला केला शेवटचा मेसेज, "मिस यू आई"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 09:38 AM2024-03-14T09:38:45+5:302024-03-14T09:39:31+5:30
रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने बुधवारी सकाळी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने रेस्क्यू मोहीम राबविली. दुपारी दीडच्या सुमारास ओमचा मृतदेह बाहेर काढला.
नेवासा -'मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे', असा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आईला मेसेज करत एका तरुणाने प्रवरासंगम येथे पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून जीवन संपविले. महेश ऊर्फ ओम मोहन मोरे (वय २०, रा. बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर), असे त्या तरुणाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर येथे एका खासगी कंपनीमध्ये ओमचे वडील चालक आहेत. वडील, आई, लहान भाऊ यांच्यासह ओम मोरे हा बजाजनगर येथे वास्तव्यास होता.
ओम मोरे याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आईच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून जीवन संपवत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने प्रवरासंगम येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारली. रात्री आईने मेसेज पाहिल्यानंतर ओमचा शोध सुरू झाला. दरम्यान, त्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन येथील गोदावरी पुलाजवळ मिळाले, तपास केला असता, ओमची दुचाकी प्रवरासंगम गोदावरी पुलावर मिळून आली. मंगळवारी रात्री नऊपासूनच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने बुधवारी सकाळी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने रेस्क्यू मोहीम राबविली. दुपारी दीडच्या सुमारास ओमचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात निवडीसाठी दोन गुण कमी पडल्यानेही ओम तणावात होता, असे त्याचे चुलते अमर मोरे यांनी सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, संजय माने, राम वैद्य, नेवासा येथील मराठा आंदोलक अॅड. के. एच. वाखुरे, भाऊसाहेब वाघ, राजेंद्र उंदरे, दादा निपुंगे, संभाजी सोनवणे, प्रकाश निपुंगे हजर होते.
मराठा आरक्षणासाठी 'गोदावरी'त दुसरी आत्महत्या
• २३ जुलै २०१८ रोजी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांनी उद्विग्न होऊन गोदावरी नदीवरील याच पुलावरून नदीपात्रात आत्महत्या केली होती.
• त्यानंतर ओम मोरे यानेही मंगळवारी रात्री गोदावरी नदीत उडी मारून जीवन संपविले. ही येथील मराठा आरक्षणासाठीची दुसरी आत्महत्या ठरली.
मिस यू आई...
मिस यू आई. जय व पप्पा, मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे. समाजासाठी एक जीव माझापण. जय आईसोबत कायम राहा.माझा मम्मीमध्ये खूप जीव आहे. यापुढे कायम चांगले जगा, असा आईच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज करीत ओम याने आपले जीवन संपविले.