आत्महत्येला सरकार जबाबदार
By admin | Published: September 26, 2015 03:16 AM2015-09-26T03:16:10+5:302015-09-26T03:16:10+5:30
भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे.
नवी मुंबई : भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या थापाड्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे बळीराजाला आत्महत्या करावी लागत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘अच्छे दिन आएंगे’च्या थापा मारून भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. सत्ता आली की १०० दिवसांमध्ये काळा पैसा भारतामध्ये घेऊन येणार. प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळतील अशी आश्वासने देण्यात आली. जनताही क्षणिक बावचळली, त्यांना निवडून दिले. परंतु जनहिताची कामे झाली नाहीत. गुजरातमध्ये हार्दिक पटेलचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने कामगार कायद्याला हात लावला तर खपवून घेतले जाणार नसल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनाचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.
मुख्यमंत्री आलेच नाहीत
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कामगार त्यांच्यासोबत आहेत. प्रत्येक मेळाव्यास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असतात. सरकार बदलल्यामुळे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. ते मेळाव्यास येणार असल्याचे सांगितले होते. परंतु ते मेळाव्यास आलेच नाहीत. याविषयी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.