शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या; उस्मानाबादेतील ह्दयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:08 PM2022-01-04T14:08:19+5:302022-01-04T14:08:46+5:30

शहरात चहाची टपरी चालवत दत्तात्रय वऱ्हाडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. निवडणुका आल्या की चहाची टपरी बंद करत शिवसेनेच्या प्रचारासाठी गावोगावी पायपीट करायचे.

Suicide of Shiv Sainik Dattatray Varhade who open the first Shakha of Shiv Sena at Osmanabad | शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या; उस्मानाबादेतील ह्दयद्रावक घटना

शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या; उस्मानाबादेतील ह्दयद्रावक घटना

googlenewsNext

उस्मानाबाद – १९६६ साली शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या वाणीनं राज्यभरात अनेक निष्ठावंत शिवसैनिक तयार केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या एकवचनी कारभारामुळे लाखो शिवसैनिक बाळासाहेबांसाठी जीव ओवाळून टाकण्यास तयार असायचे. बाळासाहेबांनीही कधी शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडलं नाही. शिवसैनिकांमुळेच मी शिवसेनाप्रमुख आहे हे वाक्य बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांचं प्रेमाचं नातं होतं. शिवसैनिक बाळासाहेबांना दैवत मानतात. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

उस्मानाबाद येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकांने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून दत्तात्रय वऱ्हाडे नावाच्या शिवसैनिकाने आत्महत्या केली आहे. वऱ्हाडे हे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. १९८४ मध्ये बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन वयाच्या २२ व्या वर्षी दत्तात्रय वऱ्हाडे यांनी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती.

कोणत्याही निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारासाठी सज्ज असलेले दत्तात्रय वऱ्हाडे घरोघरी जात धनुष्यबाणावरच शिक्का मारा अशी विनवणी लोकांना करायचे. बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानत वऱ्हाडे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह उस्मानाबादेत शिवसेनेचा पहिला झेंडा रोवला. त्याकाळी कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना उधारीचे पैसे घेऊन वऱ्हाडे यांनी शाखा स्थापन केली.

शहरात चहाची टपरी चालवत दत्तात्रय वऱ्हाडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. निवडणुका आल्या की चहाची टपरी बंद करत शिवसेनेच्या प्रचारासाठी गावोगावी पायपीट करायचे. वऱ्हाडे यांना ४ मुली आणि २ मुले असून आर्थिक बाजू कमकुवत असल्याने मुलांचे शिक्षण अर्धवट राहिलं. चहाच्या टपरीवर मिळणाऱ्या पैशातून त्यांनी मुलींची लग्न केली. घरची बिकट परिस्थिती असतानाही शिवसेनेवरील त्यांची निष्ठा कधी कमी झाली नाही. शिवसेनेच्या प्रचारासाठी कायम ते हजर होते असं त्यांच्या मुलांनी सांगितले. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसैनिक हे नातं किती घट्ट होते ते जाणून येते. मात्र याच शिवसैनिकाने अखेर आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.

उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू

अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण, या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाल्याची घटना घडली होती. उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे निधन झाले होते.  

Web Title: Suicide of Shiv Sainik Dattatray Varhade who open the first Shakha of Shiv Sena at Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.