सांगलीत सीआयडी उपअधिक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 12:56 PM2017-10-19T12:56:05+5:302017-10-19T14:50:00+5:30
सांगलीमध्ये एका पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सांगली- येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधिक्षक महेश उर्फ सखाहरी गिरजाप्पा गडदे (वय ५१, रा. देवल कॉम्पलेक्स, विश्रामबाग) यांनी गुरुवारी सकाळी आपल्या घरात सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नोकरीत बढती न मिळाल्याच्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
सांगली-मिरज रस्त्यावरील देवल कॉम्पलेक्समधील तिसऱ्या मजल्यावर गडदे हे पत्नी व दोन मुलांसह रहात होते. तीन महिन्यापासून ते सांगली सीआयडी क्राईम ब्रँचकडे उपअधिक्षक म्हणून रूजू झाले होते. तत्पूर्वी ते तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होते. तीन दिवसापासून ते रजेवर होते.
सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास गडदे यांनी प्लॅटच्या गॅलरीत सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. यावेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले झोपेत होती. गोळी झाडल्याचा आवाज त्यांना आला नाही. सकाळी आठच्या सुमारास घरातील मंडळी झोपेतून उठल्यानंतर गडदे यांचा शोध घेतला. ते गॅलरीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कुटूंबियांना मोठा धक्का बसला.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता माने व त्यांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. गडदे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
बोराटे यांनी स्वत: घटनेचा पंचनामा केला. गडदे यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वरमधील सहा गोळ्या होत्या. त्यापैकी चार गोळ्या त्यांनी गादीवरील उशीखाली ठेवल्या होत्या. रिव्हॉल्वरमध्ये दोन गोळ्या लोड केला. त्यापैकी एक गोळी उडाली. तर दुसरी गोळी रिव्हॉल्वरमध्येच अडकून असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
तीन पानी पत्र जप्त
महेश गडदे यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानी पत्र लिहिले होते. हे पत्र पोलिसांनी जप्त केले आहे. पत्रातील मजकूर पोलिसांनी उघड केला नसला तरी सातत्याने साईट पोस्टिंगमुळे त्यांना नैराश्य आले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिले होते. पण त्याची दखल घेतली गेली नाही. या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटूंबियांचे मत आहे. आत्महत्येला घराच्या कोणाला जबाबदार धरू नये. माझी कुणाबद्दल तक्रार नसल्याचे या पत्रात म्हटल्याची चर्चा घटनास्थळी होती.
वडील, भाऊही पोलीस खात्यात
महेश गडदे यांचे वडील गिरजप्पा हे पोलिस खात्यात फौजदार होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा भाऊ गणेश हा सहाय्यक पोलिस निरीक्षक असून ते तासगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. महेश हे पोलिस उपनिरीक्षक म्हणून खात्यात रूजू झाले. त्यांनी अमरावती, विदर्भ परिसरात सेवा बजाविली.
सांगली व कोल्हापूर लाचलुचपत विभागातही ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांची तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती करण्यात आली. तीन महिन्यापूर्वी प्रशिक्षण केंद्रातून सीआयडीकडे बदली झाली होती. पोलिस खात्यात दाखल झाल्यापासून त्यांना सातत्याने साईड पोस्टिंगवरच काम करीत होते. शिस्तबद्ध अधिकारी म्हणून त्यांची पोलिस खात्यात ओळख होती.