पिंपरी चिंचवडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 07:08 PM2017-08-19T19:08:22+5:302017-08-19T19:11:32+5:30
आई-वडील घरी नसताना शाळेतून आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकडमधील रहाटनी येथील ही घटना आहे.
पिंपरी-चिंचवड, दि. 19 - आई-वडील घरी नसताना शाळेतून आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. शहरातील वाकडमधील रहाटनी येथील ही घटना आहे. शनिवारी (19 ऑगस्ट) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अभिषेक अशोक अघाव, (वय 13) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. अभिषेक हा पिम्पळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. शनिवारी अभिषेक दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळेतुन घरी आला. त्याने खोलीचे दार आतून बंद करुण घेत दोरीच्या सहाय्याने गळफास घेत स्वतःचे आयुष्य संपवले.
तो राहत असलेल्या ठिकाणी शेजारील चाळीतच त्याची विवाहित बहीण राहत होती. तिनं अनेकदा दरवाजा वाजवूनही घरातून अभिषेक प्रतिसाद देत नव्हता. अखेर तिनं शेजा-यांच्या मदतीनं दरवाजा तोडला. त्यानंतरचे दृश्य पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. अभिषेक गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर तातडीनं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान अभिषेकनं आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, अभिषेकचे वडील हे वाहनचालक असून आई मजुरीची कामं करते.