तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Published: September 13, 2016 05:44 AM2016-09-13T05:44:42+5:302016-09-13T05:44:42+5:30
सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन व नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.
सिल्लोड/शंकरनगर : सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन व नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.
सिल्लोडमधील प्रकाश सखाराम वाघ या तरुण शेतकऱ्याने सोमवारी दुपारी शेतामध्येच गळफास घेतला. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे तो मानसिक तणावात होता. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सासूरवाडा येथील शेतकरी पांडूरंग भिका भोटकर (३०) यांनी शनिवारी मध्यरात्री कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन बहिणी, आई असा परिवार आहे.
नांदेड जिल्ह्यातील आदमपूर (ता. बिलोली) येथील रामदास कोळनुरे (३८) यांनी रविवारी कर्ज व नापिकीला कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
नंदुरबारमध्ये एकाची आत्महत्या
शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील कुकावल येथील शेतकरी योगेश हिंमतराव सनेर (४६) यांनी रविवारी मध्यरात्री शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सात लाख ५० हजार रुपयांचे कर्ज होते. (प्रतिनिधी)