लातूरमध्ये बाळंत महिलेची रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आत्महत्या
By Admin | Published: June 16, 2016 04:40 PM2016-06-16T16:40:32+5:302016-06-16T16:42:54+5:30
शौचास जात असल्याचे सांगून एका बाळंत महिलेने स्वच्छतागृहातील खिचकीच्या गजास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूरमध्ये घडली.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १६ - शौचास जात असल्याचे सांगून एका बाळंत महिलेने स्वच्छतागृहातील खिचकीच्या गजास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घढली. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही़
महादेवी सोमनाथ दमदाडे (३२, रा़ अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या बाळंत महिलेचे नाव आहे़ महादेवी दमदाडे यांचे सासर अंबाजोगाई असून माहेर रेणापूर आहे़ त्यांना पहिला मुलगा असून दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने बाळंतपणासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व सर्वोपचार रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी दाखल झाल्या होत्या़ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आले असता त्यांना दुसराही मुलगा झाला़ त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ठेवण्यात आले़
दररोजच्याप्रमाणे महादेवी यांचे वडिल शरणप्पा कलशेट्टी हे बुधवारी दुपारी गावाकडून जेवणाचा डबा आणले होते़. दुपारी दीडच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सोबत असलेल्या नातेवाईकांना शौचास जात असल्याचे सांगितले़. बराच वेळानंतरही त्या परतल्या नसल्याचे पाहून नातेवाईकांनी स्वच्छतागृहाकडे जाऊन हाक मारली़ मात्र, आतून कुठलाही आवाज येत नसल्याचे तसेच दारही उघडत नसल्याचे पाहून तेथील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले़ त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महादेवी यांनी खिडकीच्या गजास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले़. मयत महादेवी दमदाडे यांचे पती एका खासगी बसवर चालक म्हणून काम करतात.