पाणीटंचाईने त्रस्त महिलेची आत्महत्या
By admin | Published: April 11, 2016 03:04 AM2016-04-11T03:04:41+5:302016-04-11T03:04:41+5:30
पाण्यासाठी दररोज रांगेत अनेक तास ताटकळत उभे राहूनही पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलेने पतीकडे बोअरवेल घेण्याची मागणी केली होती.
पाथरी (जि. परभणी) : पाण्यासाठी दररोज रांगेत अनेक तास ताटकळत उभे राहूनही पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलेने पतीकडे बोअरवेल घेण्याची मागणी केली होती. मात्र ती मान्य न झाल्याने संतापाच्या भरात एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. पाथरी तालुक्यातील लोणी (बु) येथे शुक्रवारी ही दुर्घटना घडली.
तालुक्यातील लोणी येथे सहा महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. शकीलाबी शेख अकबर (३०) ही महिला दररोज टँकरच्या पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीमुळे कंटाळली होती. पिण्याच्या पाण्यासाठी घरी बोअरवेल करा, अशी ती पतीला सतत विनवणी करीत होती. मात्र पतीने बोअरवेल न केल्याने तिने शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचा मृत्यू झाला. (वार्ताहर)