कर्जबाजारीपणाला कंटाळून बुलडाण्यातील शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: June 6, 2017 01:30 PM2017-06-06T13:30:34+5:302017-06-06T13:34:20+5:30
आपल्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरुन तीव्र लढा देत असताना परतापूर येथील एका 46 वर्षीय शेतक-यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा), दि. 6 - राज्यातील शेतक-यांनी संपाची हाक देत रान उठवले आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरुन तीव्र लढा देत असताना परतापूर येथील एका 46 वर्षीय शेतक-यानं शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सततची नापिकी व मुलीच्या लग्नाच्या ताणतणावामुळे परतापूर येथील शेतकरी संजय रामराव घनवट यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
एकीकडे आपल्या हक्कासाठी राज्यातील शेतकरी संपावर गेलेले असतानाच शेतकरी आत्महत्येची ही दुर्दैवी घटना घडली आहे.
संजय रामराव घनवट (वय ४६) यांच्याकडे तीन एकर शेती होती. यामधील काही शेती ही कोरडवाहू असून गेल्या काही वर्षांपासून शेतात उत्पादन अतिशय कमी झाले होते. त्यामुळे संजय घनवट यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.
घेतलेले कर्ज फेडण्यासाठी घनवट यांच्याकडे पुरेसे पैस नसल्यानं ते मानसिक तणावात होते. या नैराश्यातूनच घनवट यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व सोमवारी (5 जून) पहाटे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेमुळे परतापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तलाठी सानप व इतर कर्मचा-यांनी घटनास्थळावरुन जाऊन पंचनामा केला.
तर दुसरीकडे नाशिकमध्ये नवनाथ चांगदेव भालेराव या तरुण शेतक-यानंही आत्महत्या केली आहे. ते 30 वर्षांचे होते. येवला तालुक्यातील पिंपरी येथील ते रहिवासी होते. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच दिवसांपासून पाटोदा (नाशिक ) येथे शेतकरी आंदोलनात भालेराव यांनी सक्रिय सहभाग घेतला. यानंतर सोमवारी ( 5 जून) मध्यरात्री भालेराव यांनी विष पिऊन स्वतःचे आयुष्य संपवले. कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून भालेराव यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
1 जूनपासून शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात नवनाथ भालेराव यांनी सहभाग घेऊन शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी लावून धरली होती.
नवनाथ हे एकत्रपद्धत कुटुंबात राहत होते. त्यांची संपूर्ण शेती वडिलांच्या नावावर असून त्यांनी आपल्या शेतात तीन वर्षापासून द्राक्ष बागेची लागवड केली होती. त्यासाठी वडिलांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पिंपरी सोसायटीमार्फत 13 मे 2013 रोजी सुमारे 4,50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते.
गेल्या वर्षी द्राक्षाचे पिक चांगले आले मात्र अस्मानी संकटामुळे हाताशी आलेले पिक गेले. तर यंदा द्राक्ष बागेवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न मिळाले नाही. द्राक्षबागेसाठी घेतलेल्या औषधांची उधारीही भालेराव यांच्यावर होती, अशी माहिती आहे.
दरम्यान भालेराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आईवडील व भाऊ असा परिवार आहे.