गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या; आत्महत्येचं कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 11:01 AM2017-09-15T11:01:18+5:302017-09-15T11:06:35+5:30
जिल्ह्यातील अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सी 37 बटालियनच्या जवानाने आपल्याजवळील बंदुकितून छातीत गोळी झाडून आत्महत्या केली.
गडचिरोली, दि. 15 - जिल्ह्यातील अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सी 37 बटालियनच्या जवानाने आपल्याजवळील बंदुकितून छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजता घडली आहे. अमित कुमार असे त्याचे नाव असून तो हरियाणातील मूळ रहिवासी आहे. ड्यूटी करत असताना सोबत असलेल्या सहकाऱ्याने नाश्ता करण्यासाठी चल असं म्हटले, पण त्याने नकार दिला. नंतर तिथे एकटा असताना त्याने स्वतावर गोळी चालवली. त्याला लगेच अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले पण काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. अमित कुमार यांच्या आत्हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
अमित कुमार हा विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. एप्रिलमध्ये त्याची बदली नक्षल प्रतिबंधक कारवायांसाठी अहेरी येथे असलेल्या कॅम्पमध्ये बदली झाली होती. त्यानंतर जुलैमध्ये तो कुटुंबीयांकडे सुट्टीवर जाऊन आला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक कारणातून ही आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.