राज्यात आतापर्यंत साडेनऊशे शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Published: November 23, 2015 01:30 AM2015-11-23T01:30:32+5:302015-11-23T01:30:32+5:30

सणासुदीच्या महिन्यात आत्महत्यांचा आकडा पोहोचला ३५ वर.

Suicides of up to nine hundred farmers in the state so far! | राज्यात आतापर्यंत साडेनऊशे शेतक-यांच्या आत्महत्या!

राज्यात आतापर्यंत साडेनऊशे शेतक-यांच्या आत्महत्या!

Next

अकोला : बदलते हवामान आणि सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असून, सलग दहा वर्षांपासून पीक उत्पादनाचा पैसाच हाती येत नसल्याने राज्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. यावर्षी जानेवारीपासूनआजमितीस ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षी पाऊस नसल्याने राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिकांचे उत्पादन प्रचंड घटले असून, रब्बी हंगामही हातचा गेला आहे. सलग दहा वर्षांपासून विदर्भातील कृषी विकासाचा दर शून्यावर आहे. शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा शेतकरी गारद झाला आहे. मागील दहा वर्षांपासून कधी अतवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ या ऋतुचक्रात शेतकरी भरडला आहे. उत्पादन खर्चही शेतीतून निघत नसून, कर्जाचा डोंगर, मुलींचे लग्न, शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आदींची जुळवाजुळव करताना मेटाकुटीस आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळीत आहे. यावर्षी यात दुष्काळाची भर पडली आहे. पाऊसच नसल्याने खरिपातील मूग, उडीद पिके हातची गेली. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचे उत्पादन एकरी २0 ते ५0 किलोपर्यंतच झाले आहे. मशागत, पेरणी, किडींच्या बदोबस्तासाठी फवारणी ते काढणीपर्यंत खर्च झेपावत नसल्याने शेकडो शेतकर्‍यांनी शेतातून सोयाबीन न काढणेच पसंत केले आहे. कापसाचे चित्रही वाईट असून, जूनमध्ये पेरणी केलेल्या कापसाला ज्या ठिकाणी सिंचनाची सोय होती, तिथे एकरी ३ क्विंटलच्यावर उतारा आहे; परंतु बहुतांश ठिकाणी कापसाचा एकरी उतारा एक ते दोन क्विंटल आहे. संपूर्ण राज्यातीलच चित्र वाईट असल्याने, पैशाअभावी शेतकरी सैरभैर झाला असून, सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विदर्भात यावर्षी ५८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असून, या सणासुदीच्या महिन्यात १ ते २२ नोव्हेंबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील ३५ च्यावर शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात आतापर्यंत ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सणासुदीत आत्महत्येचा आकडा वाढला आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढायचे असेल, तर सामाजिक सुरक्षिततेचा उपाय करावा लागणार आहे. दीर्घकालीन योजनांचे नियोजन करण्यास हरकत नाही; परंतु शेतकर्‍यांना सध्या तातडीच्या मदतीची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर स्पष्ट केले.

Web Title: Suicides of up to nine hundred farmers in the state so far!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.