Sujat Ambedkar On Raj Thackeray : "मुस्लीम बांधवांच्या अंगालाही हात लावू देणार नाही", सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 08:06 PM2022-04-06T20:06:47+5:302022-04-06T20:07:31+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत केलेल्या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत केलेल्या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर त्याच मशिदींसमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू, असा इशाराच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता. त्यावर आता राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे. मुस्लिम बांधवांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आता आमची आहे, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील सुजात आंबेडकर यांनी केली आहे. "उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात. वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरेल. जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना हनुमान चालीसा लावा असं सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? महाविकास आघाडीनं पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय, आता तर संधी आहे त्यांनी राज ठाकरेंवर कारवाई करावी. त्यांनी मशिदीसमोर दुप्पट स्पिकर लावून हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिल्याच्या वक्तव्यावर आमचा आक्षेप आहे. राज ठाकरे यांनी संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नये", असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत.
"अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी"
मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं आहे. "राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी", असं सुजात आंबेडकर याआधी म्हणाले होते. "माझी राजसाहेबांना विनंती आहे की तुम्ही शरद पवारांचा इंटरव्ह्यू घ्या किंवा मग स्वत: पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलीवर उभा करू नका", असंही सुजात आंबेडकर म्हणाले होते.