"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
By अण्णा नवथर | Published: May 13, 2024 07:58 AM2024-05-13T07:58:37+5:302024-05-13T08:16:17+5:30
Sujay Vikhe Loksabha Update: राहुल शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल, शिंदेंनी माणसे बोलवून तिघांना मारहाण केल्याचा आरोप.
अण्णा नवथर
अहमदनगर : पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल प्रकाशराव शिंदे यांना रविवारी रात्री वडझिरे परिसरामध्ये पैसे वाटप करताना ग्रामस्थांनी अडवले. त्यावरून तणाव निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 'उत्तरे'तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात... अशा शब्दांत व्हिडीओ ट्विट केले आहेत.
याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अनिल दत्तात्रय गंधाक्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे की. राहुल शिंदे हे आपल्या कारमधून पैसे वाटप करत होते. त्यावेळेस मी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी शिंदे यांनी लोक जमवून आपणाला मारहाण केली. साक्षीदार वर्षा पांडुरंग गंधाक्ते, पांडुरंग बबनराव गंधाक्ते हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या फिर्यादीवरून राहुल शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
राहुल शिंदे यांनी देखील फिर्याद दिली असून आपण आळकुटी येथे जात असताना आपली कार अडवून अनिल गंधाक्ते व सोबतच्या चार-पाच जणांनी आपल्या गाडीची काच फोडली. गाडीतील कागदपत्रे खाली फेकली. तसेच आपल्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली, अशी तक्रार केली आहे. यावरून अनिल गंधाक्ते यांचे विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
'उत्तरे'तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात...
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 13, 2024
(पारनेर)
अपेक्षा आहे की, या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील!#धनशक्ती_विरुद्ध_जनशक्ती@ECISVEEP@CEO_Maharashtrapic.twitter.com/a4MLZhiNCL
दरम्यान या प्रकरणातील व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये राहुल शिंदे हे कारजवळ उभे आहेत. तसेच त्यांची कागदपत्रे रस्त्यावर पडलेली दिसत आहेत. या कागदपत्रांसोबत पैशांचे बंडलही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विखे हे या निवडणुकीत धनशक्तीचा वापर करत आहेत हे मी अगोदरपासून सांगत होतो. आता तशी उदाहरणे समोर येत आहेत. वनकुटे येथेही काही लोक पैशाचे वाटप करत होते त्यांनाही लोकांनी अडवले आहे. प्रशासन विखे यांच्या दबावाखाली आहे. रात्री मी सिद्धार्थनगर परिसरात एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो तरी पोलीस उपनिरीक्षक हे थेट त्या घरामध्ये माझा पाठलाग करत आले. ही दडपशाही आहे. आमचा पाठलाग केला जातो. मात्र सत्ताधारी लोक सर्रास पैसे वाटत असताना त्यांचे वर पोलीस काहीही कारवाई करत नाहीत असे दिसत आहे, असा आरोप लंके यांनी केला आहे.