सुजितसिंह ठाकुरांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:47 PM2019-12-17T12:47:47+5:302019-12-17T12:47:47+5:30
विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी अखेरपर्यंत सुजितसिंह यांचे नाव आघाडीवर होते. मात्र एका रात्रीत त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली.
मुंबई - दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले आणि मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून पुढे आलेल्या सुजितसिंह ठाकूर यांची विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदाची संधी हुकली आहे. मात्र त्यांची ही संधी भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे हुकली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सुजितसिंह ठाकूर मराठवाड्यातील नेते असून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. उस्मानाबाद जिल्हा बीडच्या शेजारीच असून बीडमधून माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्यातील पक्ष नेतृत्वाला त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिनी आव्हान दिले. या जयंतीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.
दरम्यान पंकजा मुंडे यांनी जयंतीनिमित्त आयोजीत केलेल्या मेळाव्याला सुजितसिंह ठाकूर यांनी देखील हजेरी लावली होती. मात्र ही उपस्थिती त्यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी अखेरपर्यंत सुजितसिंह यांचे नाव आघाडीवर होते. मात्र एका रात्रीत त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. सुजितसिंह यांनी राणा जगजितसिंह यांच्या भाजप प्रवेशावेळी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. तसेच ते मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील मानले जात होते. आता विरोधीपक्षनेतेपदी मनसेतून भाजपमध्ये आलेले प्रविण दरेकर यांना संधी मिळाली आहे.