सुकन्या ठरल्या राजकीय वारस!
By admin | Published: February 15, 2017 05:37 PM2017-02-15T17:37:24+5:302017-02-15T17:37:24+5:30
राजकारणात सक्रिय नसताना चौघी रिंगणात
नाशिक : राजकारणात सामान्यत: मुलगा अथवा पुतण्याला वारस म्हणून पुढे केले जात असताना नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मात्र यंदा सहा राजकीय नेत्यांनी आपल्या मुलींना राजकीय वारस म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यात दोन मुलींना महापालिकेत कामकाज केल्याचा चांगला अनुभव असला तरी अन्य चौघी मात्र राजकारणात सक्रिय नसताना प्रथमच थेट आव्हान देऊन उभ्या राहिल्या आहेत.
सामान्यत: राजकारणात असलेले पुरुष आपल्या मुलांना वारस म्हणून पुढे आणतात. राजकारणात मुली सक्षम असल्या तरी मुलांनाच पुढे केले जाते. परंतु महापालिकेत यापूर्वी काही प्रकरणात अपवादात्मक स्थितीतच मुलींना वारस म्हणून पुढे करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या नयना घोलप, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांची कन्या कोमल मेहरोलिया तसेच माजी नगरसेवक भगवान भोगे यांनी त्यांची कन्या रिमा भोगे यांना पुढे केले होते. तिघींनी नगरसेवक पद भूषविले होते. नयना घोलप यांनी तर महापौरपद भूषविले असून, सध्याही त्या नगरसेवक आहेत. कोमल मेहरोलियादेखील विधी शिक्षण घेणारी युवती असून, त्याही नगरसेवक आहेत. आता पुन्हा शिवसेनेकडून नयना घोलप (प्रभाग २२) तर भाजपाकडून कोमल मेहरोलिया (प्रभाग २१) नशीब अजमावत आहेत. बबनराव घोलप यांची दुसरी कन्या तनुजा यांना गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले होते. परंतु आता महापालिका निवडणुकीत नशीब अजमावत असून प्रभाग २१ मधून त्या शिवसेनेकडून उमेदवारी करीत आहेत. याच प्रभागात रिपाइंचे नगरसेवक सुनील वाघ यांची कन्या नयनादेखील निवडणूक रिंगणात आहेत.