ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा शॉक
By admin | Published: May 5, 2017 04:27 AM2017-05-05T04:27:11+5:302017-05-05T04:27:11+5:30
ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला
मुंबई : ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला भारनियमनाचे ‘चटके’ बसणार आहेत. औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्याने महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला असून, मागणीच्या तुलनेत विजेच्या उपलब्धतेत सुमारे ४ हजार मेगावॅटचा तुटवडा आहे.
राज्यात महावितरणची सध्या विजेची कमाल मागणी १९ हजार मेगावॅट आहे. तर संपूर्ण राज्याची विजेची मागणी सध्या २२ हजार ५०० मेगावॅट आहे. मागील काही दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे १ हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. राज्यातील वीजनिर्मितीचे काही संच बंद पडल्याने तसेच कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पॉवर प्लांट, एनटीपीसीमधून महावितरणला वीज उपलब्ध न झाल्याने ३ हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच वीज निर्मितीचे काही संच नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असल्याने आणखी १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे.
या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करून घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
वीजनिर्मिती संच वापरावे
२०१६च्या टेरिफ आॅर्डरनुसार आणि पॉवर परचेस अॅग्रिमेंटनुसार महावितरणकडे ७ हजार मेगावॅट जादा वीज आहे. भारनियमनाची वेळ येईल तेव्हा जादा वीजनिर्मिती संच सुरू ठेवायला हवे. ते आपण वापरत का नाही? हा मूळ प्रश्न असून, भारनियमन बेकायदेशीर असल्याचे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले.