विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गदा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, नवे शैक्षणिक वर्ष वेळेवरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 06:34 AM2022-03-30T06:34:27+5:302022-03-30T06:34:38+5:30

पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून २४ मार्च रोजी परिपत्रक काढून देण्यात आली. तसेच एप्रिलअखेर घेतलेल्या परीक्षांचा निकाल मे महिन्यात जाहीर करावेत, असेही त्यात नमूद केले आहे.

summer vacation of students not to be cancelled commissioner clarifies | विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गदा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, नवे शैक्षणिक वर्ष वेळेवरच

विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गदा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, नवे शैक्षणिक वर्ष वेळेवरच

Next

मुंबई/औरंगाबाद : एप्रिलअखेर शाळा सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकावरून शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालकांचा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने परीक्षा झाल्या नसतील अशाच शाळांनी एप्रिलअखेर शाळा सुरू ठेवाव्यात, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या किवा शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर गदा न येता पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून २४ मार्च रोजी परिपत्रक काढून देण्यात आली. तसेच एप्रिलअखेर घेतलेल्या परीक्षांचा निकाल मे महिन्यात जाहीर करावेत, असेही त्यात नमूद केले आहे. मात्र, या सूचनांमध्ये बरीच संदिग्धता असल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालकांकडून याला विरोध करण्यात आला. या सूचना कोणत्या मंडळासाठी लागू आहेत? ज्या शाळांच्या परीक्षा पार पडल्या आहेत, त्यांनी काय करावे? उन्हाचा तडाखा असणाऱ्या विदर्भ मराठवाड्यातील शाळांनी काय व्यवस्था करावी, यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून याविरोधात प्रश्न उपस्थित करण्यात आले. 

मात्र, हा गोंधळ दूर करण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केवळ कोविड काळात काही कारणास्तव अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शाळांसाठीच हे निर्देश असल्याचे स्पष्टीकरण दिले. शिवाय मे महिन्यात शाळा सुरू ठेवाव्यात, असे कोणतेही निर्देश परिपत्रकात नाहीत. त्यामुळे मुलांच्या सुट्ट्या कमी होणार नाहीत, असेही त्यांनी अधोरेखित केले. 

सुट्टीचा बेत रद्द करण्याची गरज नाही 
शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या की, अनेकांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागतात. काही पालक सुट्यांत फिरण्याचा बेत आखतात. मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेरगावी जाता आले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्यांत फिरण्याचा बेत आखला होता; परंतु उन्हाळी सुट्या रद्द झाल्याचा गैरसमज करत शिक्षण विभागाच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला होता. मात्र, सुट्या रद्द होणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवावे लागतील. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेऊन १ मे रोजी निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाळांना उन्हाळी सुट्या राहतील. सुट्या कमी अथवा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. -  अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक 

Web Title: summer vacation of students not to be cancelled commissioner clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.