'या' वसाहतीत विकासाचा सूर्य उगवलाच नाही!
By admin | Published: September 27, 2016 05:37 PM2016-09-27T17:37:27+5:302016-09-27T17:37:27+5:30
बहुतांश गोरगरिब व मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पंचशिल नगर वसाहतीत विकासाचा सूर्य अद्याप उगवलाच नाही.
सुनील काकडे/ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 27 - बहुतांश गोरगरिब व मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पंचशिल नगर वसाहतीत विकासाचा सूर्य अद्याप उगवलाच नाही. पिण्याचे स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, विद्यूत पथदिवे, दैनंदिन साफसफाई आदी मुलभूत सुविधांपासून हा परिसर आणि तेथे वास्तव्य करणारे नागरिक कोसोदूर असल्याचे विदारक वास्तव आहे.
नगर परिषद स्तरावरून राबविल्या जाणाऱ्या कुठल्याच योजनांची अंमलबजावणी या पंचशील नगरात झालीच नाही. वाशिम-पूसद रोडवर रेल्वेस्टेशनला लागूनच असलेल्या या भागात अधिकांश घरे कच्चा स्वरुपातील असून या भागात अद्याप अंतर्गत रस्तेच तयार झालेले नाहीत. घराघरांमधून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी एकही नाली नाही. विद्यूत खांबांवर पथदिव्यांची प्रभावी सोय नाही, नगर परिषदेने कुठे २ इंची; तर कुठे ४ इंची पाईपलाईन टाकली.
मात्र, या पाईपलाईनवर असलेल्या नळांना पुरेशा प्रमाणात पाणीच येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. उन्हाळाच नव्हे; तर बारमाही जाणवणाऱ्या पाणीटंचाईमुळे संपूर्ण पंचशिल नगर परिसर हैराण झाला आहे. कच्चा रस्त्यांवर पावसाळ्यात चिखल साचतो. त्यामुळे रस्त्यांवरून चालणे कठीण होते. सोबतच मुलांना शाळेत जाता येत नाही, हे या भागातील नागरिकांचे दुखणे आहे.