रविवार ठरला ‘घात’वार!
By Admin | Published: February 8, 2016 04:28 AM2016-02-08T04:28:08+5:302016-02-08T04:28:08+5:30
राज्यभरात रविवारी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन जणांचा दरड कोसळून, दोन जणांचा गुदमरून, तर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे
मुंबई : राज्यभरात रविवारी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन जणांचा दरड कोसळून, दोन जणांचा गुदमरून, तर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे रविवार राज्यासाठी घातवार ठरला आहे. जळगावातील रावेर येथे भोकर नदी काठावरील खाणीत जेवत असलेल्या दोन मजुरांच्या अंगावर दरड कोसळून त्यांचा अंत झाला़ रविवारी दुपारी तामसवाडी गावालगत ही घटना घडली. कडू साहेबराव ढाकणे(४२) व प्रल्हादसिंग शंकरसिंग राजपूत (५०) अशी मृत मजुरांची नावे आहेत़
अहमदनगरमधील राहाता येथील साकुरी शिवारात मोठ्या प्रमाणात वीजभट्ट्या असून, बहुतांश कामगार परराज्यातून आलेले आहेत. अनुप मोहन राज (१८) व मिथून राजकुवर राज (१२, दोघेही रा. उत्तर प्रदेश) हे दोघे पहाटे भट्टीवर गेले. परंतु प्रचंड धुराच्या लोळात त्यांना श्वास घेणे मुश्किल झाले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मानव रुहानी केंद्रात सुरू असलेल्या नामदान सप्ताहासाठी बडोदा येथून आलेल्या तीन युवकांचा येथील लाटीपाडा धरणात रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. आकाश पाटील(१६), युवराज बागुल(२०) आणि भरत राठोड (२६) अशी त्यांची नावे असून ते धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेले होते. तसेच राजस्थानातील गोपालक कुुटुंबातील एका महिलेसह तिच्या दोन मुलींचा चंद्रपुरमधील चिमूर तालुक्यातील सावगाव-मालेवाडा परिसरात तलावात बुडून मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी तलावावर गेली असताना महिलेच्या मुली पाण्यात पडल्या आणि त्यांना वाचविण्यासाठी गेली असताना तिचाही बुडून मृत्यू झाला. (प्रतिनिधी)