रविवार ठरला ‘हीट’वार

By admin | Published: February 20, 2017 04:20 AM2017-02-20T04:20:23+5:302017-02-20T04:20:23+5:30

बाळासाहेबांच्या स्मारकापासून बकाल मुंबईपर्यंत, डम्पिंग ग्राउंडपासून महापालिका शाळेतल्या टॅबपर्यंत, रस्त्यावरील खड्ड्यांपासून मुंबईच्या

Sunday became the 'heat' day | रविवार ठरला ‘हीट’वार

रविवार ठरला ‘हीट’वार

Next

सचिन लुंगसे / मुंबई
बाळासाहेबांच्या स्मारकापासून बकाल मुंबईपर्यंत, डम्पिंग ग्राउंडपासून महापालिका शाळेतल्या टॅबपर्यंत, रस्त्यावरील खड्ड्यांपासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यापर्यंत आणि झोपड्यांपासून गगनभेदी टॉवरपर्यंत ‘करून दाखवले’सह ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत शिवसेना-भाजपासह उर्वरित राजकीय पक्षांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीला अखेर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता पूर्णविराम मिळाला. विशेष म्हणजे याच ‘गरमा-गरमी’त मुंबईच्या कमाल तापमानाने ३८ अंशाचा पारा गाठला.
परिणामी, अखेरचा रविवार ‘हिटवार’ ठरला.
गेल्या १५ दिवसांपासून मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या २२७ प्रभागांत राजकीय पक्षांच्या प्रचार-प्रसाराच्या रणधुमाळीने वेग पकडला होता. शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्यानंतर ३८ अंशांहूनही अधिक राजकीय वातावरण तापले. रविवारची पहाट उगवली तीच ‘सुपर संडे’ने. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही शिवसेनेची जमेची बाजू ठरल्याने मुंबापुरीत उसळलेल्या ‘भगव्या रक्ता’ने शहरासह उपनगरातल्या रस्त्यांवर उत्साह संचारला. रविवारचं तांबडं फुटलं आणि शिवबंधनाने बळकटी आलेल्या मनगटांनी भगवा खाद्यांवर घेत शिवधनुष्य पेलले. तत्पूर्वीच विजयापूर्वीच उमेदवाराचे गळे माळांनी फुलले. दुचाकीच्या स्टँडवर भगवा फडकला आणि गल्लीपासून ‘दिल्ली’पर्यंतचे तख्त वाघाच्या डरकाळीने हादरले. मुंबापुरीतल्या शिवसेनेच्या शाखागणिक निघालेल्या प्रचार-प्रसार रथांनी ‘सुपर संडे’त जान आणली.
वाघ डरकाळी फोडत असतानाच रस्त्यावर आलेल्या इंजिनाची शिट्टी वाजताच मनसेच्या ‘छाव्या’च्या बछड्यांनी मुंबई काबीज केली. ‘हाता’वर तुरी देत ‘घड्याळ्या’चे ठोके बंद करणारे इंजिन भरदुपारी मुंबापुरीच्या रस्त्यांवर वेगाने धावताना दिसले... इथल्या चिखलात फुललेल्या ‘कमळा’ने ‘सबका साथ’ म्हणत मुंबईला मिठी मारली. विमानतळालगत वसलेल्या झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यासह ‘मेट्रो’वर स्वार होत फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांनी ‘सुपर संडे’ आणखी सुगंधी केला. पूर्व उपनगरातील झोपड्यांवर ‘हात’ ठेवत भिडलेल्या कार्यकर्त्यांनी उर्वरित पक्षांना ‘हात’ दाखवण्याचे आवाहन मतदार राजाला केले. घड्याळाची ‘टिक-टिक’ ऐन रविवारीही धिम्या गतीने असली तरीदेखील घड्याळ बंद पडू न देण्याचे आवाहन मतदारांना करत कार्यकर्त्यांनी ‘हिट’ ठरलेल्या रविवारचा उत्साह शिगेला पोहचवला होता. एकंदर शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने प्रचाराचा शेवटचा रविवार ‘हिट’ करत मोठ्या प्रमाणात सत्कारणी लावला. प्रचार-प्रसाराचा रविवार ‘हिट’ ठरल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला तरी दिवसभर उठलेल्या ‘भगव्या वादळा’नेच मुंबापुरीचा उत्साह द्विगुणित केल्याचे चित्र प्रथमदर्शनी तरी होते.

पालिका निवडणुकीसाठी पोलिसांचे सुरक्षा कवच
मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला असून, घातपात होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा कडेकोट वॉच ठेवण्यात आला आहे. पालिका निवडणुकांच्या काळात घडणाऱ्या सर्व राजकीय हालचालींंवर नजर ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी विशेष निवडणूक कक्षाची स्थापना केली आहे.

मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि अंमलदारांस केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १२ तुकड्या, राज्य दहशतवादविरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शीघ्रकृती दल मदतानाच्या ठिकाणांसह शहरात जागोजागी तैनात ठेवण्यात आले आहे. महत्त्वाची ठिकाणे, बाजारपेठा, मंदिर या ठिकाणचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. असे पोलिसांचे सुरक्षा कवच तयार आहे.

तयार है हम - मुंबई महापालिका

निवडणुकीसाठी साधारणपणे ७ हजार ९९४ कंट्रोल युनिट तर ९ हजार २७९ एवढे बॅलेट युनिट व मेमरी असणार आहे. यामध्ये आरक्षित संचांचाही समावेश आहे.

३ हजार ६०० वाहने निवडणुकीसाठी तैनात
२१ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान

२२७ प्रभागांसाठी
७ हजार ३०४ मतदान केंदे्र

मतदान केंद्रावर प्रत्येकी किमान ५ कर्मचारी
निवडणुकीसाठी एकूण ४१ हजार ३२९ कर्मचारी कार्यरत

२७ प्रभागांमधून २ हजार २७५ उमेदवार
१,१९० पुरुष उमेदवार, १ हजार ८४ महिला आणि एका इतर उमेदवाराचा समावेश
१३ स्टॅटीक पथके, ९८ भरारी पथके; तर ३९ व्हिडीओ सर्व्हेलियन्स पथकांचा उमेदवारांवर वॉच
४०,४४२ एवढी प्रभागनिहाय
सरासरी मतदारसंख्या आहे.

Web Title: Sunday became the 'heat' day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.