Sunday Holiday: रविवारी शासकीय सुट्टी जाहीर; उपसचिवांचा अनोख्या आदेशाने सरकारी कर्मचारी दु:खीच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:12 AM2021-08-24T10:12:57+5:302021-08-24T10:13:23+5:30
Sunday Holiday: प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार दिलेले असतात. मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि गोपाळकालाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी दिली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने पाच दिवसाचा आठवडा हे सूत्र मान्य केल्यामुळे दर शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी असते. मात्र येत्या अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. अर्थात त्या दिवशी रविवार असताना ही सुट्टी जाहीर करण्याचा अनोखा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार दिलेले असतात. मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि गोपाळकालाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी दिली जाते. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज. जी. वळवी यांनी मात्र रविवार असताना त्याच दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे फर्मान जारी केले आहे. हे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कार्यालयांना लागू असणार आहेत, असेही त्यात नमूद केले आहे.
यावर्षी अनंत चतुर्दशी रविवारी आल्यामुळे एक सुट्टी बुडाल्याचे दुःख शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना असताना, उपसचिवांनी रविवारी शासकीय सुटी जाहीर करून त्यांना आणखी दुःख देण्याचाच प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया मंत्रालयात दिवसभर होती.