रविवार ठरला मोर्चांचा वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 05:31 AM2016-10-24T05:31:04+5:302016-10-24T05:31:04+5:30
दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने एकीकडे सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू असताना राज्यात चार ठिकाणी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले
सिंधुदुर्गनगरी/वर्धा/रायगड : दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने एकीकडे सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू असताना राज्यात चार ठिकाणी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले. त्यामुळे रविवार मोर्चाचा वार ठरला. कोकणात पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग व विदर्भात वर्धा येथे सकल मराठा समाजातर्फे कोपर्डी घटनेचा निषेध, आरक्षण व इतर मागण्यांसाठी विराट मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
दिवाळीच्या तोंडावर रविवारी निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे मोर्चे काढण्यात आले. कोपर्डीच्या घटनेचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल, आरक्षण आदी मागण्यांसाठी मराठा समाज एकवटला होता. विशेष म्हणजे महिलांचीही मोर्चात मोठी उपस्थित होती. युवतींनी प्रशासनाला मागण्यांचे पत्र दिले.
विदर्भात वर्धा येथे रखरखत्या उन्हात मुलींच्या नेतृत्वात मराठा-कुणबी बांधवांचा क्रांती मूक मोर्चा निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. १० मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय व महिलांविषयी आपत्तीजनक लिखाण करणारे इतिहासकार ब.मो. पुरंदरे यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी पहिल्यांदाच करण्यात आली. तर रायगड जिल्ह्यात माणगावमध्ये मोठ्या संख्येने मराठा बंधू-भगिनी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तहसील कार्यालयाच्या मैदानात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मुलींनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. महिला व तरुणींनी प्रांताधिकारी, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. माजी मंत्री आ. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले, आ. धैर्यशील पाटील, आ. प्रवीण दरेकर आदी राजकीय नेतेही मोर्चाला उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अकोला : तलाक पद्धतीला समस्या बनवून मुस्लिमांच्या शरिअतमध्ये सरकारतर्फे होणारा हस्तक्षेप त्वरित थांबवावा व सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात दाखल केलेले शपथपत्र मागे घ्यावे, अशी एकमुखी मागणी मुस्लीम मौलवी, मुफ्ती व उलेमांनी रविवारी एका मंचावर येऊन सरकारकडे केली.
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी मौलाना मुफ्ती रशीद, मुफ्ती ए बरार, मौलाना अब्दुल रशीद सहाब यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर निषेध सभा झाली. शरिअतमधील तलाक प्रथेचा विरोध करीत न्यायालयात गेलेल्या महिला या मुस्लीम असूच शकत नाहीत. याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र मागे घ्यावे. इस्लामशी संघर्ष करण्यात शक्ती लावू नये, असे मौलाना मुफ्ती रशीद यांनी स्पष्ट केले.
मुस्लीम पर्सनल लॉमधील हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही, मुस्लीम पर्सनल लॉ कुराणातील अविभाज्य घटक आहे. शरिअतवर कोणी आक्षेप घेण्याचा प्रयत्न करेल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही मुफ्ती रशीद म्हणाले.
सिंधुदुर्गनगरीतील मोर्चाने गर्दीचा उच्चांक मोडला. कडक उन्हातही मराठा समाजबांधव एकवटले होते. सकाळी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला युवतींनी पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली.
माजी मुख्यमंत्री आ. नारायण राणे, भाजपा नेते व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, आ. नीतेश राणे, माजी खा. नीलेश राणे आदी सहभागी झाले होते. तरुणींनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.