राज्याच्या महाधिवक्तापदी नागपूरचे सुनील मनोहर?
By Admin | Published: November 5, 2014 04:34 AM2014-11-05T04:34:58+5:302014-11-05T04:34:58+5:30
नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची राज्याचे नवे महाधिवक्ता (अॅडव्होकेट जनरल) म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे
यदु जोशी, मुंबई
नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची राज्याचे नवे महाधिवक्ता (अॅडव्होकेट जनरल) म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्याचे महाधिवक्ता दरियास खंबाटा यांनी सप्टेंबरमध्येच राजीनामा दिला असून, नवीन व्यवस्था होईपर्यंत त्यांना पदावर राहण्यास राज्यपालांनी सांगितले होते.
देशातील नामवंत विधिज्ञांमध्ये ज्यांची गणना होते असे अॅड. व्ही.आर. मनोहर यांचे सुनील हे पुत्र आहेत. त्यांचे बंधू अॅड. शशांक मनोहर हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आहेत. योगायोग म्हणजे व्ही.आर. मनोहर हे महाधिवक्ता राहिले आहेत. अॅड. सुनील मनोहर हे दिवाणी आणि संविधानिक प्रकरणांतील निष्णात विधिज्ञ आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. सुनील यांच्यात महाधिवक्ता पदाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारला योग्य सल्ला देण्याबरोबरच सरकारची बाजू न्यायालयात तितक्याच समर्थपणे मांडू शकणारी व्यक्ती म्हणून मनोहर यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याचे म्हटले जाते. त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
याबाबत सुनील मनोहर यांनी अॅडव्होकेट जनरल पदासाठी विचारणा झाल्याचा इन्कार केला. मात्र विचारणा झाल्यास सांगेन, असेही ते म्हणाले.