शिवसेनेच्या सुनील पाटीलने माझ्यावर पिस्तूल रोखले- रोहिणी खडसे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:22 AM2021-12-29T05:22:02+5:302021-12-29T05:24:20+5:30
Rohini Khadse : जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या कारसमोर तीन मोटारसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला.
मुक्ताईनगर : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर सोमवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चार अशा सातजणांविरुद्ध मंगळवारी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई आणि चांगदेव ग्रा. पं. सदस्य पंकज कोळी यांचा समावेश आहे.
जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या कारसमोर तीन मोटारसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला. यावेळी गाडीच्या प्रकाशात चेहरे दिसून आले, त्यात सुनील पाटील याने वाहनांच्या डाव्या बाजूने येऊन माझ्याकडे पिस्तूल रोखले.
चांगदेव ग्रा. पं. सदस्य पंकज कोळी याच्या हातात तलवार होती तर, छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून लॉक असल्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी गाडीवर हल्ला चढविला. यात गाडीची काच फुटली.
अंधारात त्यांच्यासोबतचे अन्य चार अनोळखी आरोपीही या हल्ल्यात सामील होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.