कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 06:24 AM2019-08-11T06:24:06+5:302019-08-11T06:24:42+5:30

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले.

Sunshine in Kolhapur-Sangli: Flood started; Huge scarcity of petrol, diesel, cereals and vegetables | कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

Next

कोल्हापूर/सांगली/सातारा : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले. या भागातील पूरही ओसरू लागला असला तरी त्याची गती संथ आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यही वेगाने सुरू आहे. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, धान्य आणि भाज्यांची तीव्र टंचाई पूरग्रस्त भागात जाणवत आहे.

ब्रह्मनाळ येथे गुरुवारी बोट बुडून जे वाहून गेले होते, त्यातील पाच जणांचे मृतदेह आज पूर ओसरू लागल्याने सापडले.
कोल्हापूर, सांगलीत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. वांगी २०० रुपये किलो, पालेभाज्या १२५ ते १६० रुपये किलो, तर कोथिंबीर जुडी १०० रुपये भावाने विकली जात आहे. एटीएम बंद असल्याने खिशात रोकड नाही.

शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापूरमधील चौदापैकी दोन पंपांवर उपलब्ध असलेले पेट्रोल व डिझेल संपल्यानंतर ते बंद करण्यात आले. प्रत्येक दुचाकीत जास्तीतजास्त शंभर रुपयांचे पेट्रोल दिले जात होते. पंपावर लांबच लांब रांगा होत्या. पाच तासांच्या वाटपानंतर चौदा पंपांवरील पेट्रोल संपले.

कोल्हापूरात ८४ रुपये किलो असलेली तूरडाळ १२५ रुपये किलो, १०० रुपयांच्या आसपास असलेला मसूर २०० रुपये, तर मटकी १६० रुपयांनी विकली जात आहे. सांगली जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. भाज्या अभावानेच मिळत आहेत. राज्याला दूधपुरवठा करणाऱ्या या पट्ट्यातच दूध मिळेनासे झाले आहे. त्यामुळे काही दूध संघ, स्थानिक संस्था व व्यक्तींना मोफत दूधपुरवठा केला.

क-हाड, पाटणचा महापूर ओसरला
सातारा जिल्ह्यातील पाटणसह क-हाड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दोन्ही तालुक्यांतील पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने शनिवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे वक्री दरवाजे पाच फुटांवर आणण्यात आले. सध्या नदीपात्रात ४५ हजार २६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर आवक ५१ हजार २६७ क्युसेकने सुरू आहे. पाणीसाठा १०२.८६ टीएमसी आहे.

सांगलीत पूर ओसरतोय इंचाइंचाने
सांगलीत अद्यापही ६० टक्के भाग पाण्याखाली असून, नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच होते. पूर इंचाइंचाने ओसरत आहे. कोल्हापूर व सांगलीतील पूर पूर्णत: ओसरण्यास आणखी किमान ७२ तास लागतील, अशी अपेक्षा असून, त्यानंतर जनजीवन सुरळीत होईल, मात्र त्यावेळी रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस पाऊ स पडता कामा नये.

पूरग्रस्तांना पूर्वीपेक्षा अधिक भरपाई : मुख्यमंत्री
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीतील उपाययोजना करण्यासाठी १५९ कोटी रुपये आकस्मिक निधीतून देण्यात आले आहेत. आपत्तीमधील मृतांच्या नातेवाइकांना पूर्वी दीड लाखाची मदत दिली जायची, ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते म्हणाले की, अपंगत्व आल्यास पूर्वी ४३ हजार रुपये दिले जात, आता दोन लाख रुपये देण्यात येतील. उपचारासाठीसुद्धा आर्थिक मदत दिली जात आहे. घर पडले तर पूर्वी ६० हजार रुपये भरपाई होती, आता एक लाख भरपाई मिळेल.
जनावरांची हानी झाल्यास ३० हजार, बैलासाठी २५ हजार रुपये, शेतीमधील गाळ काढण्यासाठी १३ हजार, तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी ३८ हजार रुपयांची मदत केली जाईल. जेथे उद्योग, व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांच्याबाबतही मदतीचे धोरण स्वीकारले जाईल.

शिरोळमध्ये पूरस्थिती गंभीरच
शिरोळमधील १२ गावांना अजूनही पुराचा वेढा असून, त्यांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम् येथून नौदलाचे एक पथक १२ बोटींसह येथे दाखल झाले. तालुक्यात शनिवारी पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून अन्नाची तीन हजार पाकिटे पोहोचती करण्यात आली.
 

Web Title: Sunshine in Kolhapur-Sangli: Flood started; Huge scarcity of petrol, diesel, cereals and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.