राज्यात बदली व नियुक्तीचा सुपर बाजार - माजी मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:53 AM2017-09-25T02:53:07+5:302017-09-25T02:53:20+5:30
दिवास्वप्न दाखवत भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. दिलेल्या एकाही वचनाची पूर्तता गत तीन वर्षांत झाली नाही. उलट केंद्र व राज्यातील आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे.
यवतमाळ : दिवास्वप्न दाखवत भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. दिलेल्या एकाही वचनाची पूर्तता गत तीन वर्षांत झाली नाही. उलट केंद्र व राज्यातील आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे. पारदर्शकतेचा डांगोरा पिटणा-या सरकारातच बदली आणि नियुक्तीचा सुपर बाजार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त यवतमाळात आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपा सरकारच्या तीन वर्षांच्या सत्ताकाळात शेतकरी, युवक, व्यापारी, अल्पसंख्याक व दलितांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. उद्योगपतींसाठी रिझर्व्ह बँकेचे व्याजदर कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक शेतमालाचे भाव पाडले जात आहेत. मेक इन इंडिया, अॅडव्हॉन्टेज विदर्भ, मिहानमध्ये एकही उद्योगधंदा आलेला नाही. काँग्रेसचा बुलेट ट्रेनला पूर्णत: विरोध असून, हे अंतर विमानाने तासाभरात गाठता येते, त्यासाठी अनाठायी खर्च करून बुलेट ट्रेन लादली जात आहे. त्यातही तिकिटांचे दर हजारोंच्या घरात राहणार आहेत. केवळ गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी जपानच्या पंतप्रधांनाचा अहमदाबादमध्ये रोड शो घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल अर्थव्यवस्थेतून केवळ बहुराष्टÑीय कंपन्यांनाच मोठा फायदा होणार आहे. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जीएसटीची संकल्पना काँग्रेसची आहे. मात्र, भाजपा ती चुकीच्या पद्धतीने राबवत आहे. त्यामुळे आता व्यापाºयांवरही आत्महत्येची वेळ आली आहे. राज्य विधिमंडळात प्रकाश मेहता, सुभाष देसाई समृद्ध मार्गासाठी नियुक्त केलेले सीईओ मोपलवार, एसआरए प्रकरणातील निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचे अनेक पुरावे मुख्यमंत्र्यांकडे दिले. मात्र, त्यांनी या सर्वांनाच पाठीशी घालण्याचे कंत्राट घेतले आहे. केवळ एकनाथ खडसे अडचणीचे वाटत असल्याने त्यांची न्यायालयीन चौकशी लावण्यात आली. इतरांना मात्र सेवानिवृत्त अधिकाºयांकडूनच चौकशी करून क्लीन चिट दिली जात असल्याचे त्यांनी सांगिंतले.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मारकांचे केवळ भूमिपूजनावरच काम थांबले. अशीच स्थिती समृद्धी मार्गाची आहे. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा काम करत असून, भपकेबाजपणा सुरू असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार नंदिनी पारवेकर, माजी आमदार विजयाताई धोटे, पक्ष निरीक्षक श्याम उमाळकर, के. के. शुक्ला आदी उपस्थित होते.
नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, राणे यांना काँग्रेस पक्षच कळला नाही. कुणाला मंत्री करायचे हा निर्णय मुख्यमंत्री घेत नसतो, तो सर्वानुमते दिल्लीतूनच ठरतो.