सर्वसामान्यांचा ‘सुपरफास्ट’ प्रवास

By admin | Published: March 3, 2017 05:44 AM2017-03-03T05:44:22+5:302017-03-03T05:44:22+5:30

सर्वसामान्यांसाठी सध्या अनारक्षित ट्रेन जरी धावत असल्या तरी सोयी-सुविधांनी युक्त आणि सुपरफास्ट अशा ट्रेन सेवेत नाहीत.

The 'Superfast' journey of general public | सर्वसामान्यांचा ‘सुपरफास्ट’ प्रवास

सर्वसामान्यांचा ‘सुपरफास्ट’ प्रवास

Next


मुंबई : सर्वसामान्यांसाठी सध्या अनारक्षित ट्रेन जरी धावत असल्या तरी सोयी-सुविधांनी युक्त आणि सुपरफास्ट अशा ट्रेन सेवेत नाहीत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने सर्वसामान्यांसाठी अनारक्षित सुपरफास्ट ‘अंत्योदय’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात या ट्रेनची घोषणा केल्यानंतर मुंबईसाठी पहिलीच ट्रेन लवकरच चालवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. ताशी १३0 च्या वेगाने धावणारी सुपरफास्ट ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते टाटानगर अशी चालवण्यात येणार आहे.
२0१६-१७ मधील रेल्वे अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी सुपरफास्ट अंत्योद्य ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते एर्नाकुलम-हावडा अंत्योद्य ट्रेनचा शुभारंभ तीन दिवसांपूर्वीच करण्यात आला. सर्वसामान्यांसाठी ट्रेन असल्याने ही ट्रेन आरक्षित ऐवजी अनारक्षित ठेवण्यात आली आहे. आता मुंबईतील एलटीटी येथूनही टाटानगरसाठी ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रेनची वेळ मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
अंत्योद्य ट्रेन ही २२ डब्यांची असेल आणि या ट्रेनच्या सर्व डब्यांची बांधणी एलएचबी प्रकारातील करण्यात आली आहे. एखादा अपघात झाल्यास त्यामध्ये जास्त जिवितहानी होऊ नये यासाठी एलएचबी प्रकारातील डबे बांधण्यात आल्याचे मुख्य जनसपंर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे या ट्रेनचा जास्तीत जास्त वेग हा ताशी १६0 पर्यंत जावू शकतो.
परंतु सध्या रेल्वे ट्रॅकची क्षमता पाहता ही ट्रेन ताशी १३0 वेगाने धावेल. जनशताब्दी, राजधानी व दुरोन्तो ट्रेनही याच वेगाने धावतात. सीटिंग असणाऱ्या या ट्रेनच्या प्रत्येक डब्याची प्रवासी क्षमता १00 असून उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची क्षमता जवळपास २00 एवढी आहे.
>कोकणसाठी तेजस ट्रेनची प्रतीक्षा
उत्तरेसाठी मध्य रेल्वेकडून अंत्योदय ट्रेन सुरु केलेली असतानाच कोकणसाठी तेजस ट्रेन कधी असा सवाल उपस्थित होत आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून सीएसटी ते करमाळी अशी सुपरफास्ट तेजस ट्रेनची घोषणा केली होती. परंतु ही ट्रेन अद्यापही सुरु झालेली नाही.
ट्रेनची वैशिष्ट्ये
प्रवासी सामान ठेवण्यासाठी गाद्या असलेल्या रॅक
अग्निशामक यंत्रणा,
मोबाईल चार्जींग पॉर्इंट
एलईडी लाईट्स
सांडपाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
लांबच्या प्रवासासाठी सुपरफास्ट अनारक्षित ट्रेन जरी असली तरी दोन ते तीन दिवस लागणाऱ्या प्रवासासाठी अंत्योद्य ट्रेन कितपत यशस्वी ठरेल आणि त्याला प्रवासी प्रतिसाद देतील,हे पाहण्यासारखे ठरेल.

Web Title: The 'Superfast' journey of general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.