२४ हजार ७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:31 AM2020-02-25T02:31:40+5:302020-02-25T02:31:56+5:30
पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला सादर होणार असताना वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तब्बल २४ हजार ७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यामुळे बजेटपूर्वी सरकारने मिनीबजेटच मांडल्याचे दिसते.
नगरविकास विभागासाठी ३४२ कोटी, गृहनिर्माण विभागासाठी १६५२ कोटी, पाणी पुरवठा विभागासाठी ४४२ कोटी रूपये अशा महत्त्वाच्या तरतुदीदेखील आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूरात आलेल्या पूरामुळे नुकसान भरपाई आणि नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ५ हजार ३७९ कोटी रूपयांची तरतूद आहे. शासकिय इमारतींची दुरूस्ती- नव्याने बांधणी, रेल्वे उड्डाणपूल, पादचारी रस्ते, रस्ते विस्तारीकरण, शहरी रस्ते बांधकाम आदीसाठी तब्बल २ हजार कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहेत.
कर्जमाफीसाठी १५ हजार कोटी
या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यासाठी करण्यात आली आहे. ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी २ हजार कोटी रुपये यासाठी यापूर्वीच काढून ठेवण्यात आले होते. यात भर घालण्यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीतून १ हजार कोटी रु. काढून ती रक्कम यात जमा करण्यात आली. तर १२ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून एकूण १५ हजार कोटी रुपये यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी २६ कोटी शेतकऱ्यांच्या पिकाचे विमा हप्ते भरण्यासाठी १५० कोटी, शिवभोजन योजनेसाठी ६ कोटी ३८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईसाठी १०० कोटी
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई पर्यटन प्रकल्पाला १०० कोटी रूपयांचा निधीही या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.