दहावी, बारावी नापासांसाठी पुरवणी परीक्षा
By admin | Published: May 23, 2015 12:16 AM2015-05-23T00:16:58+5:302015-05-23T00:26:13+5:30
सरकार विचार करणार : विनोद तावडे यांची माहिती--लोकमतचा पाठपुरावा
चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूर
दहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकप्रमाणे जूनमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याबाबत नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहून विचार करता येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कर्नाटकात दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च, एप्रिलमध्ये घेतली जाते. तिचा निकाल दीड महिन्याच्या आत लावला जातो. या परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जून महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश घेता येतो. जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, तरी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांतून किंवा आवश्यकतेनुसार वाढीव जागा निर्माण केल्या जातात.
महाराष्ट्रात मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाते. महिन्यानंतर निकाल लागतो.
या संपूर्ण प्र्रक्रियेत निम्मे वर्ष जाते. पुढच्या वर्गासाठी प्रवेशाचे दरवाजे बंद होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. मुख्य परीक्षेनंतर सहा महिन्यांनी परीक्षा होत असल्यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही सरासरी १५ टक्के इतके कमी आहे. कर्नाटकात पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा आधार ठरली आहे. वर्ष वाया जात नसल्यामुळे वैफल्याची भावना येत नाही. पुन्हा जोमाने अभ्यास करून नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाचे धडे घेतात.
याबाबत ‘लोकमत’ने २४ ते २६ मार्च या काळात तीन भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी कोल्हापुरात आलेल्या तावडे यांच्याकडे ‘लोकमत’ने यासंबंधीची विचारणा केली. त्यावर हा विचार खूप चांगला आहे. राज्यातील नापास विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, याची माहिती घेऊन महाराष्ट्रातही अशी पुरवणी परीक्षा घेता येते का, याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असे तावडे यांनी सांगितले.