१३ हजार ३३२ मेट्रिक टन शेतमालाचा पुरवठा

By admin | Published: June 7, 2017 03:36 AM2017-06-07T03:36:55+5:302017-06-07T03:36:55+5:30

ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे

Supply of 13 thousand 332 metric tons of farmland | १३ हजार ३३२ मेट्रिक टन शेतमालाचा पुरवठा

१३ हजार ३३२ मेट्रिक टन शेतमालाचा पुरवठा

Next

सुरेश लोखंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे. यामुळे मुंबईकरांसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ताज्या भाजीपाल्यापासून वंचित राहावे लागले. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये १३ हजार ३३२ मेट्रिक टन अन्नधान्य व भाजीपाल्याचा ट्रक भरून शेतमाल मंगळवारी पहाटे ४ वाजता धडकल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सोमवारी शेतकऱ्यांनी राज्यभर बंद पाळलेला असतानाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाणे, मुंबईकरांसाठी ताजा भाजीपाला मंगळवारी पहाटेच पोहोच झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या संपाची दाहकता आता कमी झाली आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर आदी जिल्ह्यातून तर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातूनदेखील भाजीपाला व अन्नधान्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे होलसेल मार्केटमधील माल सकाळीच किरकोळ बाजारपेठांमध्ये आल्यामुळे ठाणेकरांसह मुंबईकरांना बळीराजाने सुखद धक्का दिला.
एमपीएमसी मार्केटसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड येथील होलसेल मार्केटमध्ये घेवडा, वांगी, टोमॅटो, वाटाणा, शिराळी, सुरण, शेवगा, गाजर, काकडी, बटाटा, कांदा, या भाज्यासह मेथी, पालक, मुळा, शेपू, कोथिंबीर, कांदापात, कडीपत्ता इत्यादी पालेभाज्या होलसेल बाजारभावाने विकला गेल्या. हाच भाजीपाला आजच्या किरकोळ बाजारपेठेत थोड्या चढ्या दराने म्हणजे ७० ते १२० रूपये किलोने ग्राहकांना विकण्यात आला. हा तर बुधवारी मात्र हे भाव खाली आलेले दिसणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. कल्याणच्या बाजारपेठेत ५३ ट्रक व ६५ टेम्पोव्दारे पाच हजार ९५३ मेट्रिक टन अन्नधान्य व भाजापाला आला. राज्यातील १०१ आणि अन्य राज्यातील २८ ट्रक -टेम्पोतून हा शेतीमाल ठाणे , कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी आला आहे. कांदा-बटाटा १५७० क्विंटल, भाजीपाला २१५५, फळे ८८२ आणि ११३६ क्विंटल अन्नधान्याचा पुरवठा झाला आहे. भिवंडी मार्केटमध्ये २० टेम्पो, १० ट्रकदारे १०० टन भाजीपाला आला. मुरबाडला पाच टन भाजीपाला आणि २४ टन कांदा-बटाटा आला आहे. सरळगावच्या मंगळवारच्या बाजारात या मालाची उपलब्धता झाल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत.
वाशीच्या एपीएमसीमध्ये १५७ गाड्यांव्दारे २,३३४ टन कांदा- बटाटा आला आहे. ३५४ गाड्यांनी २,५८० टन फळांची आवक झाली. ४२९ गाड्यांनी २४८० टन भाजी आणि २०२ गाड्यांनी ४७७८ मेट्रिक टन अन्नधान्याची आवक बाजारात झाली आहे.
बुधवारनंतर राज्य व परराज्यातून अन्नधान्य व भाजीपाल्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. यामुळे भावाची घसरणही होईल. परंतु, मागील चार दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचा भाव मंगळवारी बाजारात कमी होता.
किरकोळ व्यापाऱ्यांनी आडमुठेपणा करून तो काही प्रमाणात चढ्या दराने विकला. मात्र, हे भावही लवकरच घसरण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

Web Title: Supply of 13 thousand 332 metric tons of farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.