जाहिरातीतील उत्पादनांचा पुरवठा करा!
By admin | Published: May 6, 2016 05:30 AM2016-05-06T05:30:10+5:302016-05-06T05:30:10+5:30
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली आदिवासी विकास विभागाने कोणत्या कंपनीची उत्पादने हवीत हे निविदेतच नमूद केले आहे.
- यदु जोशी, मुंबई
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली आदिवासी विकास विभागाने कोणत्या कंपनीची उत्पादने हवीत हे निविदेतच नमूद केले आहे. विशेष म्हणजे, ज्या उत्पादनांची जाहिरात टी.व्ही. अथवा रेडिओवर येते, अशीच उत्पादने
खरेदी करण्याची अजब अटही निविदांमध्ये टाकली आहे.
आदिवासी आश्रमशाळांमधील
हजारो विद्यार्थ्यांना नित्य उपयोगाच्या
वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अमरावती,
नागपूर, नाशिक, ठाणे या चार
आदिवासी विकास विभागांमध्ये सुमारे
२८ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांची उत्पादने मिळावी हा हेतू असला तरी त्याआडून विशिष्ट कंपन्यांचीच उत्पादने वापरण्याचा आग्रह कशासाठी धरला जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हँडवॉश लिक्विड, फिनाईल, टूथब्रश, डिटर्जंट पावडर, सॅनिटायझर, भांडी धुण्याचा साबण याबाबतीतदेखील विशिष्ट कंपन्यांचीच नावे निविदेत नमूद करण्यात आली आहेत. विशिष्ट ब्रँडवर मेहरनजर ठेवण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रामदेवबाबांचं चांगभलं
- २,६६,३२० टूथपेस्ट पुरविताना त्या कोलगेट, ओरल-बी, दंतकांती, पेप्सोडंट वा क्लोज अप कंपनीच्याच असाव्यात, अशी अट घातली आहे. दंतकांती ही रामदेवबाबांच्या पतंजलीची टूथपेस्ट आहे.
- अमरावती विभागाने दिलेल्या जाहिरातीत अंघोळीचा साबण लाइफबॉय, सिन्थॉल, लक्स, रेक्सोना किंवा समकक्ष कंपन्यांचा असावा, असे म्हटले आहे. समकक्ष म्हणजे काय याची कुठलीही व्याख्या देण्यात आलेली नाही. कपडे धुण्याचा साबण रिन, सर्फ एक्सेल, टाईडचाच असावा, असे नमूद आहे.
काही कंपन्यांची नावे निविदेत नमूद करण्यामागे विद्यार्थ्यांना ब्रँडेड वस्तू मिळाव्यात हाच उद्देश आहे. मात्र, त्यातून विशिष्ट कंपन्यांवर मेहरनजर ठेवली जात असल्याचे प्रतीत होत असल्याने निविदेत बदल करून केवळ ‘ब्रँडेड’ वस्तू पुरविण्याची अट टाकली जाईल. - विष्णू सवरा, आदिवासी विकास मंत्री