चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकारांना पुढील आठवड्यापासून मदत देण्यास सुरुवात होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 06:30 PM2020-05-06T18:30:28+5:302020-05-06T18:36:33+5:30
कलाकारांच्या मदतीसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कला क्षेत्रातील 63 संस्था एकत्र
पुणे: कोरोनामुळे चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकारांना आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्या मदतीसाठी आम्ही प्रयत्न करत असून या गरजू कलाकारांकडून मदतीसाठीचे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यांना पुढील आठवड्यापासुन मदत पुरविण्यात येणार आहे. मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
कलाकारांचे विविध प्रश्न जाणून घेण्याबरोबरच चित्रपट महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी (दि.5) फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.
ते म्हणाले, कलाकारांच्या मदतीसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कला क्षेत्रातील 63 संस्थांना एकत्र आणले आहे. त्याद्वारे या संस्था एकत्रितपणे काम करणार असून, फक्त कोरोना काळात नव्हे तर या संस्था पुढील काळातही एकत्रपणे काम करतील. सद्यस्थितीत कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्वच कला प्रकारांना आर्थिक झळ बसलेली आहे. त्यासंदर्भात तांत्रिक विभागातील कलाकार, निवेदक, तमाशा कलाकार, लावणी कलाकार, नाट्य कलाकार, जादूगार अशा सर्व कलाकारांसह अनेक राजकीय पक्षांच्या कला संघटनांशी चर्चा केली आहे.
....
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये चित्रीकरण सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू
चित्रपट - मालिकांचे चित्रीकरण सुरू व्हावे याचा पाठपुरावा आम्ही करत आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये छोट्या समुहांमध्ये चित्रीकरण सुरु व्हावे, यासाठी सरकारशी चर्चा सुरु आहे. यासाठीचे निवेदन सरकारला पाठवले आहे. याला ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्हाधिकार्यांची मंजुरी मिळाली तर चित्रीकरण सुरू होऊन कलावंताचे नुकसान थांबेल. या मे अखेरपर्यंत चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी मिळेल असे वाटते. चित्रीकरण सुरु करताना कलाकारांची कोरोना तपासणीसह विविध गोष्टींची खबरदारी घेण्यात येईल. चित्रपटगृहांचेही मोठे नुकसान झाले आहे. म्हणुनच चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलावी. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी घाई करु नये. चित्रपट आता प्रदर्शित केले तर त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत साशंका आहे. कोरोना संपल्यानंतर चित्रपट प्रदर्शनाची संख्या मोठी असणार आहे.
--------
कला क्षेत्रातील सिझन सप्टेंबरनंतर पुन्हा सिझन सुरु होईल असे वाटते. मार्च 2020 ते मार्च 2021 आर्थिक फटका या क्षेत्राला बसणार आहे. भविष्यात असे काही घडलेच तर त्यासाठी आपण तयार असावे, यासाठीच चित्रपट वितरणापासुन ते लाईव्ह ऑडिशन कसे देतात, याचे मोफत प्रशिक्षण शिबिर यु-ट्यूबवर शिबिर घेणार आहोत. पुढील आठवड्यापासून त्याला सुरुवात होईल. चित्रपट व्यवसाय पुन्हा उभारावर आणण्यासाठी तांत्रिक गोष्टींशी संबंधित प्रशिक्षणही देणार आहोत असेही मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.
-----------------