भाजपाच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र, उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:27 PM2022-07-05T20:27:06+5:302022-07-05T20:27:49+5:30
आता यावर उद्धव ठाकरे भाजपा प्रणित आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले आमदार मुर्मू यांना मतदान करतील असे कालच म्हटले होते. यामुळे खासदार कोणाला मतदान करतात, यावर सारी गणिते अवलंबून असणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मविआ नको म्हणत भाजपासोबत जाण्यासाठी बंड पुकारल्याची घटना ताजीच असताना आता राष्ट्रपती निवडणुकीवरून शिवसेना खासदाराने भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. तसे पत्रच त्यांनी थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना पाठविल्याने राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
१८ जुलै २०२२ रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या पदासाठी यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. मुर्मू या आदिवासी समाजातील असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. त्यांनी शिक्षिका म्हणून सुरुवात केली व त्यानंतर अरोबिंदो इंटीग्रल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट, रायंगपूर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले आहे. या नंतर त्या ओडीसा सरकारच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत होत्या. द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून महत्वाची कामगिरी सुध्दा पार पाडलेली आहे, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती असताना एन.डी.ए. च्या उमेदवाराला पाठिंबा न देता प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील असल्या कारणाने त्यांना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांना देखील त्यांनी असाच पाठिंबा दिला होता. मुर्मू यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता आपण मुर्मू यांना पाठिंबा दयावा व तसे आदेश सर्व शिवसेनेच्या खासदारांना द्यावेत, अशी मागणी करत असल्याचे शेवाळे म्हणाले.
आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती #द्रौपदी_मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी माझ्या वतीने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.@murmuu_draupadi@OfficeofUTpic.twitter.com/wBEY0VQLVB
— Rahul Shewale - राहुल शेवाळे (@shewale_rahul) July 5, 2022
आता यावर उद्धव ठाकरे भाजपा प्रणित आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले आमदार मुर्मू यांना मतदान करतील असे कालच म्हटले होते. यामुळे खासदार कोणाला मतदान करतात, यावर सारी गणिते अवलंबून असणार आहेत.