अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबाः देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:45 PM2020-06-10T15:45:52+5:302020-06-10T15:46:12+5:30
पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.
मुंबईः कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, भारतालाही त्याला मोठा फटका बसला आहे. देशातल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. ठाकरे सरकारही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. राज्यात जवळपास ९० हजारांपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला, शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कोकणात मोठं नुकसान झालंय, सरकारची मदत तोकडी आहे, महापुरावेळी निकष बाजूला ठेवून मदत केली, यावेळीही सरकारने तसंच करावं, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार यंदा अधिवेशनाचा कालावधी कमी करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ३ ऑगस्टपासून सुरु होईल, तसेच हे अधिवेशन फक्त ४ दिवस चालेल असं सांगण्यात येत आहे. मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच सरकारी अधिकारी, कर्मचारी, आमदार यांना एकत्र आणून हे अधिवेशन कसं करायचं यावर बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात विधानसभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ७८ आमदार आहेत, अधिवेशनासाठी विधान भवन तसेच मंत्रालयातील कर्मचारी अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित असतात, मात्र यंदाचं अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा वेगळं असणार आहे, कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने अधिवेशनाचं स्वरुप, कालावधी या सर्व गोष्टी बदलणार आहेत.