न्यायव्यवस्थेतील दिरंगाईमुळे हैदराबादच्या एन्काउंटरला समर्थन : उज्ज्वल निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:22 PM2019-12-11T12:22:36+5:302019-12-11T12:30:45+5:30
विश्वास कमी होणार नाही, मात्र एखाद्या क्रूर गुन्ह्यासाठी जलद यंत्रणा हवी
सोलापूर : हैदराबाद येथे एका तरुणीवर अत्याचार करून तिचा जाळून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींना एन्काउंटरमध्ये गोळ्या घालून मारण्यात आले. या कारवाईचे स्थानिक व देशभरात स्वागत करण्यात आले, मात्र न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला असे नाही. क्रूर गुन्ह्यातील आरोपींना लवकर शिक्षा होत नाही, याची खंत लोकांमध्ये आहे, असे मत सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
सोलापुरात गाजलेल्या अॅड. राजेश कांबळे खून प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात येऊन माहिती घेतली. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, हैदराबाद येथील एका तरुणीवर झालेला अत्याचार हा अतिशय क्रूर पद्धतीचा होता. पोलिसांनी तत्काळ चार आरोपींना अटक केली, तपासासाठी घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर झालेल्या चकमकीत चौघांचा मृत्यू झाला. सर्वसामान्य नागरिक म्हणून मी त्यांना त्यांची शिक्षा मिळाली, असे म्हणेन. कायद्याचा अभ्यासक म्हणून बोलायचं झालं तर पोलिसांना न्याय देण्याचा अधिकार नाही, असेही अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले.
एखादा क्रूर गुन्हा घडल्यानंतर विशिष्ट मुदतीत खटल्याचा निकाल लागला पाहिजे. आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध होत असतील तर त्वरित शिक्षा होणे अपेक्षित आहे. गुन्हेगारी वृत्तीला थांबवता येत नाही, मात्र त्याला आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आणि भीती निर्माण झालीच पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास क्रूर गुन्ह्यांना आळा बसेल. अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही, असेही अॅड. उज्ज्वल निकम यावेळी बोलताना म्हणाले.
पोलिसांना चौकशीला सामोरे जावे लागणार
- हैदराबाद येथील एका तरुणीवर अत्याचार केलेल्या चार आरोपींचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र भविष्यात संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कायदेशीर संकटांचा सामना करावा लागणार आहे. कर्मचाºयांची चौकशी होईल, प्रसंगी संबंधितांच्या नोकºया जाऊ शकतात. कारवाईनंतर लोकांनी आनंदोत्सव केला तरी अशा प्रसंगी कर्मचारी व अधिकारी यांच्या बाजूने कोणी येणार नाही. कारवाई करणे तसे सोपे आहे, मात्र पुढे कायदेशीर बाबी निस्तरणे अवघड आहे, असेही यावेळी अॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.