माझा पाठिंबा प्रसारासाठी

By Admin | Published: June 16, 2015 01:48 AM2015-06-16T01:48:58+5:302015-06-16T01:48:58+5:30

मी आजपर्यंत कधीच खेळामध्ये राजकारण केले नाही आणि करणार नाही. विजय पाटील ज्या वेळी माझ्याकडे त्यांची संकल्पना घेऊन आले तेव्हाच मला

To support my support | माझा पाठिंबा प्रसारासाठी

माझा पाठिंबा प्रसारासाठी

googlenewsNext

मुंबई : मी आजपर्यंत कधीच खेळामध्ये राजकारण केले नाही आणि करणार नाही. विजय पाटील ज्या वेळी माझ्याकडे त्यांची संकल्पना घेऊन आले तेव्हाच मला त्यांच्यातील क्रिकेटविषयी असलेली तळमळ दिसली आणि मी लगेच त्यांना पाठिंबा दर्शवला, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभे असलेले क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. दरम्यान, या वेळी क्रिकेट फर्स्ट गटाचे सगळे उमेदवार आणि शिवसेना नेते सुभाष देसाई व युवानेते आदित्य ठाकरे यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.
पूर्वीचे क्रिकेट प्रेक्षणीय होते. त्या तुलनेत आताचे क्रिकेट नाही. हे चित्र बदलण्यासाठी मी विजय पाटील यांना पाठिंबा दिला आहे, असे सांगतानाच ठाकरे यांनी उपस्थित मतदारांना आवाहन केले की, ३२९ लोकांच्या हातात मुंबई क्रिकेटचे भवितव्य असल्याने ही साधी निवडणूक नाही, त्यामुळेच विचार करून आपले बहुमूल्य मत योग्य व्यक्तीला द्या, असेही सांगितले.
काँग्रेसच्या पाटील यांना पाठिंबा दिल्याच्या होत असलेल्या आरोपाचा या वेळी ठाकरे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. मी काँग्रेसच्या व्यक्तीला पाठिंबा दिल्याचे म्हणता तर तुम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलात याचा आधी विचार करावा, असे सांगून त्यांनी प्रतिस्पर्धी गटावर ‘बाऊंसर’ टाकला. त्याचवेळी ठाकरे यांनी विजय पाटील यांना आश्वासनही दिले की, जर त्यांचा गट विजयी झाला तर मुंबईव्यतिरिक्त डहाणू, ठाणे-डोंबिवली परिसरात क्रिकेट प्रसारासाठी जागा उपलब्ध करून देण्यास मदत करू; तसेच विजयी झाल्यावर पाटील यांच्या गटाने एमसीए क्रिकेटच्या सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही केली.
मी कायमच क्रिकेटचा विचार प्रथम केला आहे. या दृष्टीनेच जेव्हा मी आमचा मुंबई क्रिकेट बाबतीतचा अजेंडा ठाकरेंसमोर मांडला तेव्हा लगेच त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला. ते स्वत: क्रिकेटप्रेमी असून, त्यांनादेखील मुंबई क्रिकेटमध्ये बदल पाहायचा असल्याने त्यांनी सर्व शक्ती आमच्या मागे उभी केली, असे डॉ. पाटील यांनी या वेळी सांगितले. तसेच ठाकरे - पाटील घराण्याचे ऋणानुबंध फार पूर्वीपासून आहेत. माझे क्रिकेट परिवर्तनाचे असलेले प्रामाणिक प्रयत्न पाहून त्यांनी लगेच मला मोठ्या भावाप्रमाणे आधार दिला, असेही त्यांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)

या वेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी गटावर शाब्दिक हल्ला करताना म्हटले की, आज क्रिकेट खूप बदलले आहे, त्यात अनेक बदलही झाले आहेत. सुनील गावसकरपासून सचिन तेंडुलकरपर्यंत सगळे एका वेळेनंतर रिटायर्ड झाले. परंतु आमचे अध्यक्ष काही रिटायर्ड व्हायला बघत नाहीत. बरं, इतका वेळ मैदानात राहूनदेखील स्कोर काय? तर शून्य! मग कसा होणार क्रिकेटचा प्रसार? असे म्हणत सध्याच्या एमसीए कार्यकारिणीवर त्यांनी टीका केली.

Web Title: To support my support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.