राज ठाकरेंच्या भूमिकेचे जांबुवंतराव धोटेंकडून समर्थन
By admin | Published: July 29, 2016 04:27 PM2016-07-29T16:27:17+5:302016-07-29T16:27:17+5:30
अॅट्रॉसीटी कायद्याचा दिवसेंदिवस गैरवापर होत आहे. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या वस्तुनिष्ठ आणि साहसिक भूमिकेला आपले समर्थन आहे.
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २९ : अॅट्रॉसीटी कायद्याचा दिवसेंदिवस गैरवापर होत आहे. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या वस्तुनिष्ठ आणि साहसिक भूमिकेला आपले समर्थन आहे. जात आणि धर्माचा अनुनय करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे, असे माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी येथील विश्रामगृहात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
धोटे म्हणाले, अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षतेच्या घोषणा देत जाती व्यवस्था मोडीत काढून समान कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. मात्र ७0 वर्षे उलटल्यानंतरही अद्याप जात मोडीत न निघता जातीयवाद वाढत आहे. सर्वच पक्ष केवळ मतांसाठी जातीचा मुद्दा जिवंत ठेवत आहेत. सर्वांसाठी एकच कायदा हे तत्व असताना, जातीनुसार कायदे केले जात आहे. भविष्यात सर्वच समाज, जाती आमच्यासाठी कायदा करा, अशी मागणी करतील. हे सर्व थांबले पाहिजे.
सध्या राजकारण मूल्यहिन, चरित्रहिन झाले आहे. अॅट्रॉसीटी कायद्याचा गैरवापर वाढला आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शस्त्र परवाना देण्याची मागणी केली. त्यामुळे देशात यादवी माजेल. याबाबत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका अत्यंत वास्तव, वस्तुनिष्ठ आणि साहसिक असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. त्यांचा मुद्दा चांगला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र दुर्दैवाने खरे बोलण्याचे साहस आज नागरिकांमध्ये नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जाती व्यवस्था मोडली पाहिजे, असे सांगत त्यांनी देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणताही कायदा न्यायासाठी असतो. मात्र त्याच कायद्याने सध्या अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.